आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअतिवृष्टीमुळे खाणींमधून कोळशाचा पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. अशातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद असल्याने विजेची तूट निर्माण होत आहे. सणांच्या काळात लोडशेडिंग अटळ असल्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. दुसरीकडे विजेची तूट भरून काढण्यासाठी ग्राहकांनीच आता सकाळी ६ ते १० व सायंकाळीही याच वेळेत विजेचा आवश्यक तेवढाच वापर करावा, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे. परिस्थिती बिघडत गेली व कोळशाच्या वेळेत पुरवठा झाला नाही तर आगामी काळात लोडशेडिंगला सामोरे जावे लागणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
हिंगाेली : कुठल्याही सूचना प्राप्त नाहीत
भारनियमनाचा संदर्भातील सर्व निर्णय वरिष्ठ कार्यालयाकडून घेतले जातात. त्यामुळे सध्यातरी कुठल्याही प्रकारच्या सूचना प्राप्त नाहीत. विजेचा जपून वापर करावा असे आवाहन वेळोवेळी केले जात असल्याचे हिंगोलीतील वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता दिनकर पिसे यांनी सांगितले.
परभणी : वीजनिर्मिती घटल्याने आता संकट
वीजनिर्मितीमध्ये घट झाल्याने आगामी काळात भारनियमनाची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी शेतीला कृषिपंपासाठी १८ तास वीजपुरवठा देण्यात येत होता, परंतु सध्या कृषिपंपांसाठी सायंकाळी ६ ते रात्री १० ही वेळ सोडून उर्वरित कालावधीत ८ तास वीज देण्यात येत आहे. त्यामुळे सकाळ, सायंकाळ ६ ते १० या वेळेत आवश्यक तेवढ्याच विजेचा वापर करावा. एसीचा वापर शक्यतो टाळावा. गरजेपुरतेच पंखे आणि दिवे लावावेत, असे आवाहन महावितरणचे जनसंपर्क अधिकारी धनंजय पवार यांनी केले.
जालना : योग्य पद्धतीने वीज वापर करायला हवा
कोळशाचा अधिक तुटवडा जाणवत आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम वीज निर्मितीवर झाला असून, येत्या काळात वीजेची तूट निर्माण होऊन संकट ओढवू शकते. सद्य:स्थितीत वीजेचा गरजेपुरता वापर करणे आवश्यक असल्याचे अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले.
नांदेड : जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांचे बैठकांचे सत्र सध्या झाले सुरू
वीज ग्राहकांची मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी महावितरणकडून सायंकाळी ६ ते रात्री १० ही वेळ सोडून उर्वरित कालावधीत कृषिपंपांसाठी २४ तासांपैकी ८ तास वीज दिली जात आहे. पूर्वी १८ तास दिली जात होती. आगामी काळात भारनियमन करण्याची वेळ आलीच तर याचे नियोजन कसे असायला हवे या अनुषंगाने सध्या बैठका सुरू असल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले.
..तर परळीत दोन दिवसांत वीजनिर्मिती ठप्प
परळी | परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कार्यान्वित तीन संचांपैकी दोन संचांतून वीजनिर्मिती होत आहे. सध्या दोन दिवस पुरेल एवढा कोळसा उपलब्ध असल्याचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी सांगितले. ७५० मेगावॅट विजनिर्मितीची क्षमता असलेल्या या केंद्रातून सध्या ३६५ मेगावॅट म्हणजेच निम्म्याने विजनिर्मिती होत आहे. सध्या १२ हजार मेट्रिक टन कोळशाचा साठा असला तरी दोन दिवसांत कोळसा आला नाही तर विजनिर्मिती ठप्प होऊ शकते.
लातूर : जिल्ह्याची गरज सध्या भागत आहे
लातूर जिल्ह्याचे महावितरणचे अधिकारी दिलीप भोळे म्हणाले की, लातूर जिल्ह्यात तूर्त तरी भारनियमन लागू झालेले नाही. लातूर जिल्ह्यासाठी लागणारी विजेची गरज सध्या भागत आहे. वीजपंपांसाठीचे भारनियमन पूर्वीच्याच वेळापत्रकानुसार सुरू आहे. जनतेने विजेचा वापर काटकसरीने करावा.
भारनियमन होऊ शकते, पण निर्णय राज्यस्तरावर
भारनियमन करावे लागेल अशी सध्यातरी परिस्थिती नाही. जास्तीत जास्त वीज खरेदीचा पर्याय आहे. सध्या ओपन मार्केटमधून वीज खरेदी सुरू आहे. राज्यात सध्या १३ संच बंद पडलेले आहेत. परंतु परिस्थिती बिघडली तर शेती पंप, शहरांसाठी भारनियमनाची शक्यता आहे. शहरात ज्या ठिकाणी वीज चोरी व गळती अधिक आहे अशा ठिकाणी भारनियम होऊ शकते. परंतु याचा निर्णय राज्यस्तरावरून होईल.-सुंदर लटपटे, महावितरण मुख्य अभियंता, लातूर, बीड, उस्मानाबाद.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.