आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूतील आरोपी जेरबंद:हॉटेलमालकाने पगार न दिल्याच्या रागातून फाइव्ह स्टार हॉटेल्सना गंडा घालण्याचा धंदा

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या 30 वर्षांपासून देशभरात भटकंती; हॉटेलात दारू, जेवणाचे बिल न भरताच करायचा पलायन

गेल्या ३० वर्षांपासून गोवा, दिल्ली, मुंबई अाणि कोकणातील फाइव्ह, थ्री स्टार हॉटेलमध्ये मुक्काम करून हजारोंचे बिल न भरताच पळून जाणाऱ्या ६४ वर्षीय भामट्याचे औरंगाबादेत गौडबंगाल उघडकीस आले. त्याने हॉटेल किजमध्ये एकाच वेळी १५ हजारांची दारू आणि सिगारेटची १४ पाकिटे मागवली. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापकांना संशय अाला आणि त्यांनी इंटरनेटवर काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता देशातील हाॅटेलचालकांना फसवणारा भामटा आपल्या हॉटेलमध्ये असल्याचे कळाल्यानंतर त्यांना धक्काच बसला. हॉटेल व्यवस्थापक शिंदेंनी तत्काळ वेदांतनगर पोलिसांना कळवल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. जॉन ज्ञानप्रकाश विन्सेन्ट ऊर्फ भिमसेंट जॉन (६४, रा. नटराजपुरम, तामिळनाडू) असे भामट्याचे नाव आहे. ताे २००७ मध्ये जालना रस्त्यावरील दोन अालिशान हॉटेलमध्ये राहून पळून गेला होता.

भीमसेंट जॉनने ६ जून रोजी फाेनवरून रेल्वेस्थानक रस्त्यावरील हॉटेल किज (हॉटेल दि ऑरस) मध्ये खोली बुक केली हाेती. ताे ७ जून रोजी दुपारी हॉटेलात दाखल झाला. त्याने व्यवस्थापक विजय शिंदे यांना भेटून बुकिंग केल्याचे सांगितले. शिंदे यांनी त्याला प्रतिदिवस तीन हजार अाणि चौथ्या मजल्यावरील खाेली १२ जूनपर्यंत दिली. शिंदेंनी आगाऊ रक्कम भरण्यास सांगितल्यावर भिमसेंटने एशियन अॅग्रो केमिकल कंपनीकडून शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र आयोजित करायचे आहे. त्यापूर्वी रक्कम अदा करण्याचे आश्वाासन दिले. ८ जून रोजी भिसमेंटने शिंदेंना संपर्क करून हॉल कसा आहे, जेवणाची व्यवस्था कशी राहील, अशी माहिती विचारून चर्चासत्र खरे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.

चर्चासत्राचा खर्च ठरवून त्याने शिंदेंना सामानाची यादी व एलईडी प्रोजेक्टर अाणि लॅपटॉप नमूद केले. त्याने संध्याकाळी शिंदेंकडून लॅपटॉप घेतला अाणि तीन हजारांचे जेवण, २ हजार ८०० रुपयांची सिगारेटची १४ पाकिटे, ५ हजार ७३० रुपयांची दारू, लाँड्री बिल २६५ रुपये असे कर मिळून ११ हजार ७६९ रुपयांचे बिल केले. त्याने ८ जून रोजी रात्री अकरा वाजता पुन्हा १५ हजार रुपये किमतीची ब्लॅक लेबल दारू मागवली. परंतु, शिंदेंनी कॅप्टन नवनाथ बारगळ यांना नगदी पैसे दिले तरच दारू देण्यास सांगितले. त्यामुळे बारगळने त्याच्याकडे पैशाची मागणी केली, तेव्हा त्याने दारूचे बिल अंतिम बिलामध्ये लावण्यास सांगितले.

प्रेयसीचा मृत्यू झाल्यानंतर सुरू केली भामटेगिरी, यापूर्वी तीनदा अटक
मूळ तामिळनाडूचा असलेला ६४ वर्षीय भीमसेंट उच्चशिक्षित असून त्याचे इंग्रजी, हिंदीवर प्रभुत्व आहे. राहणीमानदेखील उच्चभ्रू असल्याने हॉटेलमध्ये त्याच्यावर संशय घेण्यास जागा राहत नाही. भीमसेंटचे नात्यातील मुलीवर प्रेम हाेते. मात्र, त्यांचे लग्न झाले नाही. तिचा अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर भीमसेंटने लग्न न करण्याचा निर्णय घेत घर सोडले. ताे १९९१ पासून देशभरात फिरून मोठ्या हॉटेलमध्ये राहून पोबारा करताे. तेथील लॅपटॉप, महागडे साहित्य चोरून घेऊन विकतो. जाताना पाच-सहा दिवस पुरेल इतके खाण्यापिण्याचे साहित्य घेऊन जातो. २००७ मध्ये हॉटेल अॅम्बेसेडरमध्ये असाच प्रकार घडला होता. तो भीमसेंटच असल्याची खात्री पोलिसांना आहे. तेव्हा तो स्वतंत्र तीन दिवस सूट, दारू, सिगारेट रिचवून मीटिंगचे कारण सांगून लॅपटॉप, प्रोजेक्टर घेऊन गेला हाेता. यापूर्वी तीन वेळा त्याला अटक होऊन कारागृहात गेला. मात्र, जामिनावर सुटताच तो पुन्हा अशाच प्रकारे हॉटेलची फसवणूक करून देशभरात फिरतो.

बदला कशासाठी : १९८७-८८ मध्ये जाॅन तामिळनाडूतील एका हाॅटेलात काम करत हाेता. त्या हाॅटेलचालकाने त्याला महिन्याचे वेतन न देताच किरकाेळ कारणावरून कामावरून काढून टाकले हाेते. त्याचा बदला घेण्यासाठीही जाॅनने देशभरातील हाॅटेलचालकांना गंडा घालून बदला घेण्याची माेहीमच सुरू केल्याचे चाैकशीत समाेर अाले.

सिगारेटची १४ पाकिटे अन् एक लिटर दारूमुळे अडकला
संध्याकाळी सिगारेटची १४ पाकिटे व रात्री १ लिटर दारू मागितल्यानंतर हाॅटेलचा व्यवस्थापक शिंदेंना संशय आला. त्यांनी कर्मचाऱ्यांना त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. इंटरनेटवर त्याच्या आधार कार्डची माहिती मिळवली असता जाॅनच्या नावे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे समजले. शिंदेंनी आधी लॅपटॉप परत घेतला. ताे ९ जून रोजी सकाळी साडेसात वाजता जाॅन चर्चमध्ये जाण्याच्या बहाण्याने निघताच बिलाची मागणी केली. मात्र, त्याने आल्यावर देतो, विश्वास ठेवा, असे सांगितले. शिंदेंनी त्याला अडवून ठेवून वेदांतनगर पोलिसांना माहिती दिली. निरीक्षक रामेश्वर रोडगे पथकासह दाखल झाले. त्यांनी त्याला अटक केली.

बातम्या आणखी आहेत...