आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेनगाव ते येलदरी राज्य महामार्गावर जिंतूर टी पॉइंटपासून काही अंतरावर कार खड्ड्यात कोसळून झालेल्या अपघातात चौघांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१३) मध्यरात्री घडली. मृत चौघेही बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्याचे असून नांदेड येथे मुलींसाठी रूम पाहण्यासाठी तसेच नीट परीक्षेचे व शिकवणीचे शुल्क भरण्यासाठी गेले होते. त्यानंतर गावी परत येत असताना ही दुर्घटना झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील त्र्यंबक सखाराम थोरवे (४०, पळसखेड), गजानन अंकुश सानप (४६, रा. खळेगाव), प्रकाश साहेबराव सोनुने (४३, रा. वडव), विजय परसराम ठाकरे (४५, रा. धानोरा) अशी मृतांची नावे आहेत.
हे चौघेही गजानन सानप यांच्या स्विफ्ट डिझायर कारने (एमएच २८ एझेड ११२०) रविवारी (दि. १३) सकाळी नांदेड येथे गेले होते. त्यांच्या मुली त्या ठिकाणी नीट परीक्षेची तयारी करत असून त्यांचे शिकवणी व परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी तसेच त्यांना रूम पाहून देण्यासाठी ते गेले होते. त्या ठिकाणी सर्व कामे आटोपून ते चौघेही कारने लोणार तालुक्यात परतत होते. या वेळी जिंतूर ते येलदरी रोडवरील जिंतूर टी पॉइंटजवळ असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या वळण रस्त्यावरून सुमारे १२ फूट खोल खड्ड्यात त्यांची कार कोसळली. या खड्ड्यात पावसामुळेपाणी भरले होते. कारचे दरवाजे लॉक असल्याने त्यांना पाण्याच्या दाबामुळे दरवाजे उघडता आले नाही. त्यामुळे त्यात गुदमरून चौघांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या वेळी त्या ठिकाणावरून दुचाकीवर जाणाऱ्या एका व्यक्तीने खड्ड्यात कारचा हेडलाइट सुरू असलेला पाहिला. त्यामुळे अपघात झाल्याचे लक्षात येतात त्याने तातडीने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांना माहिती दिली. त्यानंतर देशमुख यांच्यासह प्रवीण महाजन, सुदाम मुंडे, संतोष गाढवे, अमोल तिडके, अभिजित तिडके, दीपक गाढवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमधील चौघांनीही बाहेर काढले. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक दीक्षा लोकडे, उपनिरीक्षक अभयकुमार माकने, जमादार कामाजी झळके, पवार, राठोड यांच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील चौघांना सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांनी चौघांचाही मृत्यू झाल्याचे जाहीर केले. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.