आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसटीला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात कार आणि एसटीचा अपघात झाला. यात धडक बसताच एसटीच्या चालकाचे नियंत्रण सुटले व ती थेट उड्डाणपुलाच्या कठड्यावर चढली. चालकाने वेळीच सतर्कता दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली व प्रवासी सुखरूप राहिले. छावणी पाेलिसांनी कारचालकावर (एमएच २० डीव्ही ५२३८) गुन्हा दाखल केला. एसटी चालक विनायक मोरे व वाहक रवींद्र गभाणे हे बस घेऊन बुधवारी सकाळी कोल्हापूर-कागलकडे निघाले हाेते. नगर रस्त्यावरील लोखंडी पुलावरून पुढे जात असताना पाठीमागून आलेल्या कारने डाव्या बाजूने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात कार थेट बसच्या समोरच्या चाकाला येऊन धडकली. कारच्या वरचे बोनेट बसच्या दरवाजाच्या हूकला अडकले. परिणामी बोनेटला अडकलेली कार एसटीसह २० ते २५ फूट फरफटत पुढे गेली. त्यानंतर बस थेट कठड्यावर चढली. चालकाने सतर्कता दाखवत गती नियंत्रणात आणली. बसच्या उजव्या बाजूचे चाक निखळून दूर जाऊन पडले. सुदैवाने बस कठड्यावरच थांबल्याने दुर्घटना टळली. चालकाने तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. कर्मचारी संघटनेचे बाबासाहेब साळुंखे यांच्यासह पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. त्यात कारचालकाची चूक निष्पन्न झाल्याने मोरे यांच्या फिर्यादीवरून कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. अंमलदार आर. के. खाजेकर याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.