आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय वाद-विवाद:मुख्यमंत्र्यांनी धार्मिक मुद्दे सोडून आता शहराच्या विकासावर बोलायला हवे; खासदार इम्तियाज जलील

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सभेआधी खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केले १५ प्रश्न

शहरात ८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यापूर्वीच जिल्ह्याचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मंदिर-मशीद, हिंदू-मुस्लिम, औरंगाबाद-संभाजीनगर अशा मुद्द्यांना हवा न देता शहर व जिल्ह्याच्या विकासकामांवर बोलावे. प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी करत १५ प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर आमदार अंबादास दानवे यांनी इम्तियाज यांच्या पत्रावरील शाई एमआयएमची असली तरी त्यांचा बोलवता धनी, पाठीराखा भारतीय जनता पक्ष आहे, अशी टीका केली आहे.

खासदार इम्तियाज यांच्या पत्रातील मुद्दे असे
शहराला मुबलक व वेळेवर पाणी देणार का?
औरंगाबादला मंजूर झालेले क्रीडा विद्यापीठ पुण्याला गेले. ते परत आणण्यासाठी आपण काय प्रयत्न केले याची माहिती द्या.
एम्स इन्स्टिट्यूट होणार किंवा नाही? याचा खुलासा करावा.
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्ट कधी सुरू होणार?
विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होणार की नाही ? हज व उमराह यात्रेसाठी थेट विमान सेवा कधी सुरू होणार?
ऑरिक सिटीत नवीन कंपन्या येणार की नाही? ऑरिक सिटीत किती कंपन्यांचे काम सुरू झाले?, किती गुंतवणूक झाली?, किती युवकांना रोजगार मिळाला?, दावोस येथून शहराला काय आणले? याचा खुलासा करावा.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या विकासासाठी किती निधी उपलब्ध करून दिला?, राज्यातील हजारो हेक्टर वक्फ मिळकतीचे संरक्षण करण्यासाठी आपले धोरण जाहीर करावे.
सफारी पार्क पूर्ण होण्यास किती दशके लागेल?
शहरात मागील ३० ते ४० वर्षांत आरक्षित जागेवरील विकसित झालेल्या गोरगरीब वसातीतील आरक्षण कधी रद्द होणार? गुंठेवारीतील मालमत्ता कधी नियमित होणारॽ
सातारा-देवळाईतील भूमिगत मलनि:सरणासाठी निधी कधी मिळणार?, नागरिकांना मूलभूत सुविधा कधी मिळणार?
औरंगाबाद-शिर्डी या ११२.४० किमी मार्गाची श्रेणीवाढ लवकरच होणार असल्याचे आपण मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी जाहीर केले होते, ते कधी होणार?
१७ सप्टेंबर २०२१ रोजीच्या भाषणात शिर्डी विमानतळ औरंगाबादशी जोडणार असल्याचे जाहीर केले होते, ते कधी होणार?
जिल्ह्यातील कामगारांना किमान वेतन, पी.एफ., ई.एस.आय.सी. व इतर योजनांचा लाभ कधी मिळणार?
४६४ कोटींच्या भूमिगत गटार योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांकडून हा पैसा वसूल करणार का?
शहर विकासाच्या प्रारूप आराखड्याचे काय झालेॽ, पालिकेतील काेट्यवधींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार काॽ
आपल्या सभेच्या भाषणात वरील मुद्द्यांचा खुलासा करावा, अशी मागणी खा. इम्तियाज जलील यांनी पत्रातून केला आहे.

बाटलीतून जीन बाहेर निघावा असे पत्र : आ. अंबादास दानवे
८ जूनची सभा शिवसेनेच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेली आहे.

बाटलीतून जीन बाहेर निघावा असे एमआयएमचे पत्र आहे. यावरील शाई एमआयएमची असेलही, पण बोलवता धनी त्यांचा पाठीराखा भारतीय जनता पक्ष आहे.

पत्रातील अनेक विषय केंद्र सरकारच्या कारभाराशी निगडीत आहेत. जसे एम्स, स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा, प्रादेशिक विमानसेवा सुरू करणे. हे विषय दिल्लीत जाताना जलील सोयीस्करपणे विसरतात.

ऑरिक सिटीच्या शेंद्रा नोडलमध्ये आता जागा शिल्लक नाही. वर्षभरात येथे अनेक कारखाने सुरू होतील. गुंतवणुकीचा आकडा ५००० कोटींच्या पुढे आहे. जलील यांनी ‘ऑरिक’मध्ये झालेल्या कॉन्सुलेट जनरलच्या परिषदेत हजेरी का नाही लावली, वैयक्तिक भेट घेऊन कोणाकडून किती गुंतवणूक आणली हे सांगावे.

गुंतवणुकीची प्रक्रिया असते, जी जलील आणि त्यांच्या पक्षाच्या आकलनाच्या पलीकडे आहे.

जनतेच्या प्रश्नांवर ज्याला राजकारण करायचे असते ते औरंगजेबाच्या खांद्यावर बसून कुभांड रचतात. तुम्ही आणि तुमचा बोलावता धनी भाजप हे त्यातलेच.

मुख्यमंत्र्यांची सभा जोरदार होणार हे कळून चुकल्याने झालेली पोटदुखी म्हणजे हे पत्र आहे. दुसरे काही नाही.

बातम्या आणखी आहेत...