आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडताळणी:मुख्यमंत्री पाच दिवस रोज 8 तास फिरले, प्रत्येक ठिकाणी 10 मिनिटे दिली तरी फक्त 250 गणेशांचेच मनोभावे दर्शन शक्य

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीएम कार्यालयाच्या दाव्याची दिव्य मराठीने केली पडताळणी पोलिस, पंडित, गुरुजी म्हणाले : ५०० चा आकडा अतिशयोक्तीचा, मंडपाबाहेरून किंवा रस्त्यावरून नमस्कार केला तरच हे शक्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या घरी स्थापित गणेशाचे दर्शन घेतले. ही त्यांच्या जनसंपर्काची पद्धत आहे, असे म्हटले जाते. त्यांचा हा दर्शन धडाका पाच दिवसांत ५०० गणेश दर्शनापर्यंत पोहोचला, असा दावा शिंदे यांच्या प्रसिद्धिमाध्यम विभागाने केला. यात कितपत सत्यता आहे, हे जाणून घेण्यासाठी दिव्य मराठीने वाहतूक शाखेतील पोलिस अधिकारी, पूजेसाठी विविध गणेश मंडळांत फिरणारे पंडित-गुरुजी आणि दररोज नित्यनेमाने देवदर्शन करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी एकसुरात सांगितले की, ५०० चा आकडा अतिशयोक्तीचा वाटतो. मंडपाच्या बाहेरून किंवा रस्त्यावरून नमस्कार केला तरच हे शक्य आहे.

वाहतूक शाखेत वीस वर्षे काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे वेळापत्रक समजावून सांगितले. ते म्हणाले की, एका दिवसात मुख्यमंत्री ८ तास दर्शनासाठी फिरले असे आपण गृहीत धरले, तर त्यांचा ताफा एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणार, तेथे ते गाडीतून उतरून गणेश मंडळात जाणार, दर्शन घेणार, सत्कार स्वीकारणार, पदाधिकाऱ्यांशी बोलणार आणि पुन्हा गाडीत येऊन बसणार. यासाठी किमान दहा मिनिटे वेळ लागतोच. म्हणजे ५ दिवसांत २५० गणपती दर्शन होऊ शकते. त्यापुढील आकडा अतिरेकी वाटते.

शिंदे समर्थकांच्या मते यापेक्षा अधिक गणेश दर्शन झाले असणार

गणेशोत्सवात रोज सहा ते सात मंडळांमध्ये पूजा, यज्ञ करण्यासाठी फिरणारे अनंत जोशी, श्रीपाद गुरुजी म्हणाले की, मुंबई आणि इतर शहरांतील परिस्थिती वेगळी आहे. तरीही एका गणेशाच्या मनोभावे दर्शनासाठी १० ते १५ मिनिटे लागतातच. अनेक जण मंडपाचे, रस्त्यावरून दर्शन घेतात. त्यांना ५०० चा आकडा गाठणे शक्य आहे. दररोज किमान तीन मंदिरांत जाणारे माजी महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले की, दर्शन घेतले की पळत सुटायचे, असे काही धोरण असेल तर एका दिवसात ६० ते ७० गणेश मंडळांकडे जाता येईल.

पण मान्यवरांच्या घरी जायचे असेल तर हा आकडा ४० पर्यंत खाली येणारच. मात्र, शिंदेसेना गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना हे मान्य नाही. त्यांच्या मते यात काहीच अतिशयोक्ती नाही. कारण मुंबईमध्ये तीन ते चार रस्त्यांवर, चौकात ५० मंडळे असतात. त्यामुळे अर्ध्या-पाऊण तासात तेवढे दर्शन होऊ शकते. आमदार संजय शिरसाट यांनी अशी माहिती दिली की, दर्शनासाठी शिंदेंनी आठ नव्हे दहा तास दिले. परवाच्या दिवशी ते पहाटे सहा वाजता घरी पोहोचले. त्यामुळे ५०० पेक्षा जास्त गणेश दर्शन झाले असणार.

बातम्या आणखी आहेत...