आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात सर्वाधिक पाणीपट्टी वसूल करूनही मनपाकडून औरंगाबादकरांना गढूळ पाण्याची शिक्षा मिळत आहे. एक तर सहा दिवसांआड ४० मिनिटे पाणी येते त्यात गढूळ पाणी आल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वारंवार मनपा अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊनही अडचणी सोडवल्या जात नाही.
गढूळ पाण्यामुळे महिलेचा मृत्यू : सादातनगर परिसरात नळाला गढूळ पाणी येते. दोन वर्षांपूर्वी या भागातील सय्यद नदीमा मुर्तुजा (४०) यांचा मृत्यू झाला. त्यांना कावीळ झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नागरिकांनी सार्वजनिक आरोग्यसेवेच्या प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने दिले. तपासणी केल्यावर हे पाणी पिण्यास योग्य नाही, असा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे.
या भागात येते गढूळ पाणी : काचीवाडा, सिडको एन-६, संभाजी कॉलनी, सादातनगर, पवननगर परिसरातील काही भाग, जयभवानीनगर, संजयनगर, नारेगाव, अयोध्यानगर या भागात गढूळ पाण्याच्या अडचणी आहेत. काही भागांत ४० मिनिटांपैकी पहिली १५ मिनिटे अगदी घाण पाणी येते, तर काही भागात पूर्णवेळ घाण पाणी येते. विशेष म्हणजे यातील बहुतांश भागांत मजुरी करून पोट भरणारे नागरिक आहेत.
काही ठिकाणी १५ मिनिटे, तर काही ठिकाणी पूर्णवेळ अस्वच्छ पाणी
जीर्ण पाइपलाइनमुळे अडचण
शहरातील अनेक भागांत अंतर्गत पाइपलाइन टाकून २० वर्षे झाली आहेत. काही भागांत ड्रेनेज आणि पाणीपुरवठा करणारे पाइप खाली-वर आहेत. दोन्ही पाइप फुटल्यामुळे ड्रेनेजचे पाणी पिण्यासाठी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमध्ये गेले आहेत. काही ठिकाणी रस्त्याचे कामामुळे पाइप फुटले आहेत. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अशोक पद्मे यांना विचारले असता ज्या भागात तक्रार आलेली आहे तेथे तत्काळ समस्या सोडवण्याचे प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
निवेदने दिली, मात्र दुर्लक्षच
वारंवार निवेदने देऊनही समस्या सोडवल्या नाही. जीबीमध्ये या अडचणी मांडल्या मात्र प्रशासनाने काम केले नाही. - सलिमा बेगम, माजी नगरसेवक, सादातनगर
अडचणी कधी सुटतील ?
पवननगर भागातील रतनवन सोसायटी व परिसरात १५ मिनिटे घाण पाणी येते. अनेकदा तक्रारी दिली आहेत. समस्या कायम आहे. - ललित सरदेशपांडे, नागरिक
हे पाणी म्हणजे शिक्षा
सिडको एन-६ भागात आठ दिवसांतून एकदा पाणी येते. त्यातही दुषित पाण्यामुळे विकतचे फिल्टर केलेले पाणी घ्यावे लागते. - मनीष नरवडे, रहिवासी
नळाला ड्रेनेजचे पाणी
आमच्याकडे ड्रेनेजचेच पाणी येते. कर्मचारी पाहणी करून गेले १५ दिवस झाले. पण, काम झाले नाही. - श्रद्धा कुंटे, रहिवासी, काचीवाडा
आजारांचे प्रमाण वाढले
काचीवाडा, कालिका माता मंदिर परिसरात दूषित पाण्यामुळे मुले आजारी पडली आहेत. निवेदने देऊनही समस्या सोडवली नाही. आता काय करावे हे समजत नाही. – गणेश संतान्से, रहिवासी, काचीवाडा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.