आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहागंज येथील ऐतिहासिक मनोऱ्याच्या सुशोभीकरणाचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले. परंतु आतापर्यंत जुन्या घड्याळ्याची दुरुस्ती होऊ शकली नव्हती. या घड्याळाची दुरुस्ती करणारी एजन्सी मिळत नसल्याने आता तिथे इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे घड्याळ बसविण्यात आले आहे. आता या घड्याळाची टिकटिक सुरू झाली असून गजर ऐकायला मिळणार आहे.
शहागंज चमन येथे निजाम काळात ऐतिहासिक घड्याळ टॉवर उभारण्यात आले होते. शेवटचा निजाम मिर उस्मान अली खान याने 1930 मध्ये या टॉवरमध्ये भले मोठे घड्याळ लावले. रमजान काळात लोकांना सहर आणि इफ्तार सोडण्याच्या वेळा समजाव्यात यासाठी या घडीचा अलार्म वाजविला जायचा. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत ही घड्याळ चालू अवस्थेत होती. तिला नियमितपणे चावी भरावी लागत असते. मात्र, काही वर्षांपूर्वी ती बंद पडली. महापालिकेकडून या घड्याळाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले.
एजन्सीचा घेतला शोध
मध्यंतरी काही संस्थांनी पुढाकार घेत घड्याळाची दुरुस्ती करण्याची तयारी केली. मात्र त्याला मूर्त स्वरूप मिळाले नाही. त्यामुळे हे काम स्मार्ट सिटीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता काही महिन्यांपूर्वीच मनोऱ्याच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर जुने घड्याळ दुरुस्त करण्यासाठी एजन्सीचा शोध घेण्यात आला. परंतु कोणतीही एजन्सी हे जुन्या पद्धतीचे घड्याळ दुरुस्तीचे काम करण्यासाठी पुढे आली नाही.
अलार्मचीही सुविधा
त्यानंतर या टॉवरवर नवीन इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे घड्याळ बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे घड्याळ दिसायला पूर्वीच्या घड्याळासारखेच असून त्यात अलार्म वाजण्याचीही सुविधा असणार आहे. घड्याळाचे काम पूर्ण झाले असून गुरुवारपासून या घड्याळाची टिकटिक सुरू झाली आहे. पूर्वीप्रमाणे गजरही ऐकायला मिळणार आहे. असे स्मार्ट सिटीच्या प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.