आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होऊ घातलेल्या अश्वमेध राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. 3 ते 7 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या क्रीडा महोत्सवाच्या पाच मैदाने आणि खेळाडुंच्या निवास व्यवस्थेची राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारींच्या राजभवनाच्या त्रिसदस्यीय समितीने पाहणी केली. विद्यापीठातील पायाभूत सुविधांचे अवलोकन केल्यानंतर समितीने समाधान व्यक्त केले आहे. लवकरच कुलपतींना अहवाल सादर करणार असल्याची माहिती आहे.
राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारींनी यंदा विद्यापीठाला राज्य क्रीडा महोत्सवाचे यजमानपद दिले आहे. राज्यातील 22 विद्यापीठांचे जवळपास 2400 खेळाडू यात सहभागी होणार आहेत. क्रीडा प्रशिक्षक, संघप्रमुख, व्यवस्थापकांसह ही संख्या 3500 होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात खेळाडू विद्यापीठात येणार असल्यामुळे समितीने मैदाने आणि वसतीगृहांची पाहणी केली. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यासह प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे यांची यावेळी उपस्थिती होती.
राज्यपालांनी पाठवलेल्या निरीक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा.दीपक माने (पुणे) सदस्य प्रा.मोहन अमृळे (मुंबई विद्यापीठ), प्रा. दिनेश पाटील (जळगांव) यांनी पाहणी केली. विद्यापीठातील फायबर वसतीगृहांसह सर्व वसतीगृहांची पाहणी केली. विद्यापीठात 1250 मुली तर 1250 मुले येणार आहेत. त्यामुळे वसतीगृहे कमी पडत असल्याने पीईएस अभियांत्रिकी कॉलेजचे वसतीगृहे घेतली जाणार आहेत.
पीईएसच्या हॉस्टेलही समितीने पाहिली. त्याशिवाय अथेलॅटिक्स, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कुस्ती, खो-खो, कबड्डी आदी मैदानांची पाहणी केली. लवकरच राज्यपालांना अहवाल देणार असल्याचे डॉ. माने यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. येवले यांनी घेतलेल्या महात्मा फुले सभागृहातील आढावा बैठकीला अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. कल्पना झरीकर, डॉ. संजय सांभाळकर, डॉ. आनंद देशमुख, माजी संचालक उदय डोंगरे, डॉ. संदीप जगताप, प्रदीपकुमार जाधव, रवींद्र काळे आदींची उपस्थिती होती. डॉ. दयानंद कांबळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संदीप जगताप यांनी सूत्रसंचालन त तर गणेश कड यांनी आभार मानले.
29 नोव्हेंबरपासून 4 जिल्ह्यातून मशाल रॅली
तुळजापूर ते औरंगाबाद दरम्यान खेळाडुंची मशाल रॅली काढण्यात येईल. चारही जिल्हयातील खेळाडु या रॅलीत सहभागी होतील. स्पर्धेच्या उद्घाटनाला ऑलंपिकपटूंना निमंत्रित केले जाणार आहे. उस्मानाबाद, जालना, बीड आणि औरंगाबाद या चारही जिल्हयात 29 नोव्हेंबरपासून मशाल रॅली काढली जाणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने विद्यापीठाला दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे कुलगुरुंनी बैठकीत म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.