आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवारी बैलपोळा:सर्जा-राजाला सजवण्याचा खर्च २५ टक्क्यांनी वाढला ; शेतकऱ्यांची यंदा जोरदार तयारी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपासून कोरोनामुळे पोळ्याचा सण साधेपणाने साजरा करावा लागला होता. मात्र यंदा हे संकट टळले आहे. पाऊसही दमदार असल्याने शेतकरी कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे यंदा पोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्याचे नियोजन केले जात आहे. सर्जा- राजाला सजवण्यासाठीचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. मात्र सजावट साहित्य २५ टक्के महाग झाले आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

शहराजवळील शहागंज, चिकलठाणा, सावंगीसह ग्रामीण भागात शुक्रवारी (२६ आॅगस्ट) पोळ्याचा सण साजरा होणार आहे. शेतकरी वर्षभर बैलाकडून शेतीत मोठ्या प्रमाणावर कष्ट करुन घेतो, त्याच्या प्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी देतात. संध्याकाळी सजवून त्यांची मिरवणूकही काढली जाते.

पोळ्याच्या दिवशी ज्यांच्याकडे बैल नाहीत ते मातीच्या बैलांची पूजा करतात. शहरी भागात हे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी विविध आकरातील आकर्षक मूर्ती दाखल झाल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या मूर्तींच्या किमतीतही १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. चिकलठाणा गावात १२५ हून अधिक बैलजोड्या एकत्र येऊन पोळा फुटतो. यावर्षी मोठ्या उत्साहात पोळा साजरा करु, असे शेतकरी कैलास रिठे यांनी सांगितले.

बेंदूर अन‌् पोंगलही : तेलंगणाच्या उत्तरेकडे भागात बैलपोळा सणाला “पुलाला अमावास्या’ म्हटले जाते. काही ठिकाणी बेंदूर असे देखील म्हणतात. दक्षिणेत पोंगल, उत्तर व पश्चिम भारतात गोधन म्हटले जाते.यंदा निर्बंध नाहीत. गावात १ हजार बैलजोड्या आहेत. संध्याकाळी ५ वाजता पोळा फुटतो. यासाठी तयारी करत आहे, अशी माहिती अकोले अडगाव येथील शेतकरी गणेश बनसोडे यांनी दिली.

पाच हजारांपर्यंत खर्च
एक बैलजोडी सजावटीसाठी दीड ते पाच हजार रुपयांपर्यंत खर्च लागतो. यंदा हा खर्च २५ टक्क्यांनी वाढला आहे. दरवर्षी जनावरे कमी होत चालली आहेत. मात्र शेतकऱ्यांमधील उत्साह कायम आहे.
- देविदास वनारसे, विक्रेता, चिकलठाणा

घरगुती पूजनासाठी बैलजोडी
शहरात पोळा सणानिमित्त सुरेख अशा बैलजोडी आल्या असून मागणी वाढत आहे. यात १२० ते २५० रुपयांपर्यंत बैलजोडी तसेच १०० रुपयांना पाच अशा प्रकारच्या बैलजोडी उपलब्ध आहे.
- प्रिया डुघरेकर, विक्रेता

बातम्या आणखी आहेत...