आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाज प्रबोधन:संतांचे सांस्कृतिक विचार ‘रिंगण’च्या रूपात जपले ; प्रकाशनाप्रसंगी पाटील यांचे मत

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संत साहित्य समाजाचे प्रबोधन करते, मात्र आज त्यांचे विचार उंबरठ्याबाहेर दिसून येत आहेत. वारीचे उद्दिष्ट हरवून गेले असून ती इव्हेंट झाली आहे. आज संतांच्या विचारांची गरज असून तो सांस्कृतिक विचार रिंगणच्या रूपात जपल्याचे मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री अनुराधा पाटील यांनी व्यक्त केले.

मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या सचिन परब संपादित ‘रिंगण’ वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा ५ ऑगस्ट रोजी जेएनईसी महाविद्यालयाच्या आइन्स्टाइन सभागृहात झाला. यशवंतराव चव्हाण सेंटर व एमजीएम जनसंवाद वृत्तपत्रविद्या विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंकाच्या प्रकाशनप्रसंगी पाटील बोलत होत्या. व्यासपीठावर सेंटरचे अध्यक्ष अंकुशराव कदम, प्राचार्या डॉ. रेखा शेळके, डॉ. दासू वैद्य, ज्येष्ठ समीक्षक डॉ.सतीश बडवे, रिंगण अंकाचे संपादक सचिन परब, समीक्षक डॉ. रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. परब म्हणाले की, पहिल्या वर्षी नामदेव यांच्यावर अंक काढला. प्रत्येक वर्षी एका संतावर लिखाण केले जाते.

यावर्षी संत मुक्ताबाई यांच्यावर अंक काढला. त्यासाठी २४ गावांत गेलो. मुक्ताबाई यांचे ठसे आजही आहेत ते जपून ठेवले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.समीक्षक डॉ. बडवे म्हणाले की, लेखकाचे वारकरी संप्रदायाशी अतूट नाते आहे. समाजापर्यंत संतांचे विचार रिंगणच्या माध्यमातून पोहोचत आहे. रिंगण आधुनिक काळाशी जोडणारा अंक आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक कौतिकराव ठाले पाटील, माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, के. एस. अतकरे, प्रा. राहुल कोसंबी, शिव कदम, सुबोध जाधव आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...