आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:कोविड रुग्णांच्या मृत्यूची त्रयस्त वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून तपासणी करणार, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची माहिती

हिंगोली15 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयात कोवीड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी पुरेशी काळजी घेऊन त्यांना आरोग्य सेवा दिली पाहिजे. कोवीड रुग्णांच्या मृत्यूची त्रयस्त वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शनिवारी (ता. १२) दिव्य मराठीला बोलतांना दिली आहे.

हिंगोली जिल्हयात रुग्णांची संख्या चांगलीच वाढू लागली आहे. सध्याच्या स्थितीत कोवीडचे १९९० रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १५६० रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर ४०६ रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु आहेत. यामध्ये ३० रुग्ण गंभीर आजारी असल्याने त्यांना ऑक्सीजन दिले जात आहे.

शासकिय रुग्णालयात रुग्णांना पुरेशा आरोग्य सेवा मिळाव्यात याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यासोबतच गंभीर आजारी रुग्णांच्या प्रगतीबाबत रुग्णालयाकडे चौकशी केली जात असल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले. या शिवाय रुग्णालयात तसेच कोवीड केअर सेंटर या ठिकाणी भेटी देऊन नागरीकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण एक ते दिड टक्केच असून हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न आहेत. रुग्णांच्या मृत्यू बाबत तक्रारी येत आहेत. त्यासाठी आता रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्रयस्त वैद्यकिय अधिकाऱ्यांमार्फत त्याची चौकशी केली जाणार आहे. रुग्णास योग्य उपचार देण्यात आले होते काय, आरोग्य सेवेचा निष्काळजीपणा आहे काय याची चौकशी होणार असल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले.