आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रद्धांजली:लोककवी हरेंद्र जाधव यांचे निधन, प्रबोधन चळवळीला बळ देणारी लेखणी विसावली

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘भीमरायाचा मळा’ फुलवणारा प्रतिभासंपन्न गीतकार

आपल्या गीतांमधून गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर करणारे ज्येष्ठ गीतकार, लोककवी हरेंद्र जाधव (८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने लोकगीते आणि भाव - भक्तिगीतांतून लोकरंजनासोबत प्रबोधनाच्या चळवळीला बळ देणारी प्रतिभासंपन्न लेखणी कायमची विसावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या योगदानाचे हे स्मरण...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या क्रांतिभूमीत मानवमुक्तीच्या लढ्याची बीजे पेरली. अनेक क्रांतिकारक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत साहित्यिक-कलावंतांच्या याच भूमीत, ओझर (मिग) येथे जन्मलेल्या हरेंद्र जाधव यांनी आपल्या गीतांतून समता आणि प्रबोधनाचा आवाज बुलंद केला. त्यांनी लिहिलेल्या ‘पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा..’ या आणि अशा अनेक गीतांनी आंबेडकरी चळवळीला ताकद देतानाच वंचित, शोषित, पीडितांना या चळवळीचा लळाही लावला. एका अर्थाने ते बाबासाहेबांच्या विचारांचा मळा फुलवणारे गीतकार ठरले.

मुंबई महापालिकेच्या विविध शाळांमध्ये जाधव यांनी ३३ वर्षे शिक्षक म्हणून अध्यापन केले. सेवेतील शेवटची काही वर्षे ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शिक्षकी पेशामुळे चळवळीतील समकालीन बांधवांसाठी ते ‘गुरुजी’, तर आमच्यासारख्या नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांसाठी हक्काचे ‘दादा’ होते.

महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या सत्यशोधकी शाहिरी जलशाचा प्रभाव आंबेडकरी शाहिरी जलशावर होत गेला. अशा आंबेडकरी जलसाकारांच्या लेखणीचा प्रभाव दादांवर होता. बाबासाहेबांच्या विचारांनी, कार्याने प्रभावित झालेल्या पिढीचे ते पाईक बनले. त्यांनी लिहिण्यास सुरुवात केली आणि अक्षरशः हजारो गीते त्यांच्या लेखणीतून पाझरत गेली. त्यांच्या गीतलेखनाची सुरुवात १९५० च्या सुमारास झाली. दादांनी बाबासाहेबांच्या एका सभेतच आपले पहिले गीत लिहिले आणि त्यांच्यासमोरच सादर केले. त्यांच्या लेखणीतून कागदावर उतरलेल्या रचनांनी मराठी गीतांमध्ये वेगळा ठसा उमटवला. विषमता, अंधश्रद्धा, हुंडाबळी, दारुबंदी, साक्षरता, एकात्मता, पर्यावरण अशा कितीतरी विषयांवर त्यांनी प्रबोधन गीते लिहिली. अनेक संतांचे माहात्म्य, राष्ट्रपुरुषांचे चरित्र आपल्या रचनांमधून सामान्यांपर्यंत पोहोचवले.

दादांनी लिहिलेल्या, ‘पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा’, ‘हे खरंच आहे खरं भीमराव आंबेडकर’, ‘भीमरायानं समतेचा झेंडा जगी रोविला’ अशा गीतांनी आंबेडकरी चळवळीला बळ दिले. ‘तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता’, ‘आता तरी देवा मला पावशील का’, ‘मंगळवेढे भूमी संतांची’, ‘माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारू’, ‘देवा मला का दिली बायको अशी’ यांसारख्या त्यांच्या अवीट गोडीच्या गाण्यांमुळे रंजनातून प्रबोधनाची नवी वाट रुळली. शाहीर साबळे, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप यांच्यासह सुरेश वाडकर, अजित कडकडे, आनंद शिंदे, रोशन सातारकर, सुलोचना चव्हाण, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, उत्तरा केळकर अशा अनेक नामवंत गायक, संगीतकारांनी त्यांच्या गीतांना स्वरसाज चढवला. त्यांच्या गीतांच्या, पोवाडे, लोकनाट्याच्या ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती गावोगावी वाजू आणि गाजू लागल्या.

लोककवी वामनदादा कर्डक यांच्यासह दादांनी १९७५ च्या दरम्यान बौद्ध कलावंत अकादमी स्थापन केली. वंचित दुर्लक्षित कवी, लेखक, गायक, वादकांच्या हक्कांसाठी ही संस्था कार्यरत राहिली. मला दादांचा खूप जवळून सहवास लाभला. त्यांची कन्या तारका आणि राजा कांदळकर यांच्या पुढाकाराने आम्ही लोककवी हरेंद्र जाधव साहित्य संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत ‘गीत भीमायन’, ‘गीत रमायण’ आणि ‘संसार माझा आंबेडकरी’ हे गीतसंग्रह आम्ही प्रकाशित केले. गीते कशी लिहावी, अभ्यासपूर्ण विषय मांडणी कशी करावी, हे त्यांनी आम्हाला गीतलेखन शिक्षण- प्रशिक्षण कार्यशाळेतून शिकवले. त्यांनी शब्दरुपाने फुलवलेल्या अन् फुलताना पाहिलेल्या ‘भीमरायाच्या मळ्या’ची मशागत करीत राहणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.

शरद शेजवळ

बातम्या आणखी आहेत...