आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारण गुलदस्त्यात:रांजणगावातील संस्थाचालकाने शाळेला रात्रीतून ठाेकले कुलूप ; 280 विद्यार्थी मैदानात बसले

औरंगाबाद / संतोष उगले2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांजणगाव शेणपुंजी येथील पी. एम. ज्ञानमंदिर शाळेला संस्थाचालकाने रविवारी रात्री अचानक कुलूप ठाेकले. सोमवारी सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे विद्यार्थी, शिक्षक शाळेत आले. तेव्हा कुलूप पाहून त्यांनी संस्थाचालकांना फाेन केला. अखेर १२.१३ वाजता कुलूप काढल्यानंतर विद्यार्थ्यांना आत प्रवेश मिळाला. पी. एम. ज्ञानमंदिर शाळा राेज सकाळी १० ते ४ या वेळेत भरते. शाळा ६० टक्के अनुदानित असून इयत्ता पाचवी ते दहावीचे २८० विद्यार्थी शिक्षण घेतात. साेमवारी सकाळी १० वाजले तरी शाळेला कुलूप हाेते. तसेच मुख्य इमारतीत मोडतोड करून रात्रीतून शटर तयार केले हाेते. बराच वेळ वाट पाहूनही कुलूप न उघडल्याने शिक्षकांनी या मुलांना कडुनिंबाच्या झाडाखाली बसवले. ही माहिती केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकाऱ्यांना मिळाली हाेती. नंतर रजेवर असलेल्या मुख्याध्यापकांच्या दुचाकीहून आलेले संस्थाचालक काकासाहेब एकनाथराव जाधव यांनी १२.१३ वाजता शटरचे कुलूप काढले. विद्यार्थ्यांना १२ वाजून पाच मिनिटांनी शाळेत घेतल्याचे संस्थाचालक सांगत होते. मात्र, दिव्य मराठी प्रतिनिधी स्वत: १२.२५ वाजेपर्यंत शाळेच्या प्रांगणात उपस्थित होता. तोपर्यंत विद्यार्थी व शिक्षक मैदानात होते. विशेष म्हणजे शाळेला मैदान नाही, असे संस्थाचालक सांगत आहेत. तेव्हा मान्यता कशी मिळाली हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

शाळेला ३० वर्षांसाठी मैदान भाडेतत्त्वावर दिले : महाराष्ट्र विद्यार्थी विकास असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष बालचंद जाधव म्हणाले, २०१४ मध्ये सचिव काकासाहेब जाधव यांच्या स्वाक्षरीने ३० वर्षांसाठी शाळेला मैदान भाडे तत्त्वावर दिले आहे. मी राजीनामा दिल्याने संस्थेविषयी मला जास्त माहिती नाही. दुसरीकडे, संस्थेचे अध्यक्ष बालचंद हेच आहेत, असा दावा काकासाहेब यांनी केला. गटशिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल पाठवला : गंगापूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळेला कुलूप ठोकल्याची माहिती मिळताच पंचनामा करून अहवाल गटशिक्षणाधिकारी समाधान आराक यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे, असे वाळूजचे केंद्रप्रमुख देविदास सूर्यवंशी यांनी सांगितले. अहवाल मिळाल्यानंतरच नेमका प्रकार समाेर येईल, असे आराक म्हणाले.

शाळेला मैदान आहे, दिव्य मराठीकडे पुरावा : शाळेला स्वत:चे मैदान नसल्याने त्यांनी भाडेतत्त्वावर घेतले आहे. मात्र, दीड-दोन वर्षांचे भाडे थकीत असल्याने दोन फूट रुंद भिंत फोडून त्यात शटर बसवून नवीन रस्ता बनवला. त्यातूनच विद्यार्थ्यांनी ये-जा करावी, असे फर्मान काढले. काकासाहेब जाधव यांनी ३० वर्षांसाठी मैदान भाडेतत्त्वावर घेतल्याचा करारनामा दिव्य मराठीकडे आहे.

विद्यार्थी-शिक्षकांना बाहेर बसवणे चुकीचे, चौकशी करू शाळेला भौतिक सुविधा पुरवण्याची जबाबदारी संस्थेची आहे. शाळेला मैदान नसल्याचे संस्थाचालक सांगत आहेत. त्याची चौकशी करू. शाळेला कुलूप ठोकून विद्यार्थी व शिक्षकांना बाहेर बसवणे चुकीचे आहे. - एम. के. देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी

एक शाळा बंद, २० शिक्षकांचे समायोजन संस्थाचालकांनी सन १९९३ दरम्यान स्थापन केलेली शाळा २००७ मध्ये बंद पाडली. पुढे या शाळेतील २२ पैकी २० शिक्षक व कर्मचाऱ्यांचे शासनाने टप्प्याटप्प्याने समायोजन करून घेतले. मात्र, संस्थाचालक व मुख्याध्यापक जाधव, सचिव तथा शाळेच्या लिपिक असलेल्या त्यांच्या पत्नी कल्पना यांचे अद्यापही समायोजन झाले नाही. जाधव येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...