आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्स्पायरिंग - विश्वनाथन आनंद:‘आज तुम्ही जे काही करत आहात त्याचा परिणाम येणाऱ्या काळात अवश्य दिसेल’

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘खरे सांगायचे तर मी माझ्या आईमुळे बुद्धिबळ खेळाडू झालो. वडील रेल्वे विभागात काम करायचे, त्यांना नेहमी प्रवास करावा लागायचा. ते कामावर गेले की माझा खूप वेळ आईसोबत व्यतीत व्हायचा. आईनेच मला बुद्धिबळ शिकवले. आईच्या माहेरी बुद्धिबळ खेळले जायचे. मी सहाव्या वर्षी बुद्धिबळ शिकलो.

मी आठ वर्षांचा होतो तेव्हा वडिलांची बदली मनिला येथे झाली. आम्ही तेथे जवळपास वर्षभर राहिलो. त्या वेळी फिलिपाइन्स बुद्धिबळाचे हॉटस्पॉट होते. तेथील राष्ट्रीय चॅनलवर बुद्धिबळावर दररोज एक तासाचा कार्यक्रम असायचा. वेळ‌ दुपारी एक ते दोन अशी होती. या वेळेत मी शाळेत असायचो. आई दररोज ती कार्यक्रम पाहून लिहून ठेवायची. कार्यक्रमाच्या शेवटी एक कोडे दिले जायचे, आम्ही मिळून ते सोडवत असू. सोडवलेले कोडे आम्ही त्या चॅनलच्या कार्यालयात पाठवून द्यायचो.

सरावासाठी वेळ मिळाला असता तर आईसुद्धा बुद्धिबळपटू झाली असती. ती आमचे पालनपोषण करण्यात इतकी व्यग्र असायची की बुद्धिबळासाठी तिला वेळच मिळत नसे. एखादे उद्दिष्ट प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी सराव अत्यंत आवश्यक असतो. सराव केला असता तर ती बुद्धिबळ खेळू शकली असती. मी लहानपणापासून बुद्धिबळच नव्हे तर पोहायला जात असे, टेबल टेनिस, बॅडमिंटन खेळायचो. मात्र सर्वाधिक वेळ बुद्धिबळातच व्यतीत व्हायचा, कारण त्यासाठी आईची साथ मिळायची.

तुम्ही जे काही करत आहात त्याचा परिणाम येणाऱ्या काळात अवश्य दिसून येईल, हे एका बुद्धिबळपटूपेक्षा कुणालाही चांंगले समजणार नाही. बुद्धिबळाच्या पटावर प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवणे शक्य होते. मात्र जीवनात असे नसते. तेथे तुमचे फक्त स्वत:वर नियंत्रण असते. तुम्ही स्वत:ला नियंत्रणात ठेवले तरी खूप झाले. याद्वारे तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडू शकता. ही परिस्थिती असेल, हे आधीच्या चालींवर म्हणजे तुम्ही आधी जे केले त्यावर अवलंबून असते.

बुद्धिबळाची निवड करणे सोपे नव्हते. करिअरवर विचार करण्याची वेळ आली त्या वेळी निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे झाले. त्यामुळे सांगतोय, तुम्ही जे करत आहात ते मन लावून करा, कारण तुमच्या येणाऱ्या काळावर त्याचा परिणाम होतो. प्रयत्न चांगला असेल, तर चांगलेच होईल. आज एका प्रदीर्घ कारकीर्दीनंतर भूतकाळात डोकावले की मला वाटते सर्व काही चांगले झाले. काही प्रसंग वाईट होते. मात्र त्यातून बाहेर पडण्याचा आत्मविश्वास कायम होता. एखादे काम करण्यासाठी तुम्ही ज्या परिश्रमांची गुंतवणूक करता त्यातून हा आत्मविश्वास प्राप्त होतो. शंभर टक्के योगदान द्या आणि चांगले करण्याचा प्रयत्न करा. परिणाम तातडीने दिसणार नाही. मात्र नक्की दिसेल. प्रयत्न करणे आपले काम आहे, ते सोडून द्यायला नको. (विविध समाजमाध्यमांत माजी बुद्धिबळ चॅम्पियन विश्वनाथन आनंद)-

जिंकण्यासाठी फिट राहा
आत्मविश्वास अत्यंत गरजेचा आहे, नसला तरी तुमच्यात आत्मविश्वास आहे, असे दाखवा.
वेळ चांगली असली तरी स्वत:ला सतत प्रेरित करत राहा, चांगली नसेल तर अधिक प्रेरित करा.
नवीन करत राहा, हे तुमचे बलस्थान असले पाहिजे.
बुद्धिबळाचा पट असो की जीवन, जिंकण्यासाठी फिट राहा.

बातम्या आणखी आहेत...