आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:वीज पुरवठा विस्कळीत होत असल्याने गावकऱ्यांनी अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना चार तास कार्यालयात कोंडले; पोलिसांच्या मध्यस्तीनंतर उघडले कुलूप

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • डोंगरकड्यात अनेक दिवसांपासून वीज पुरवठा विस्कळीत होत होता

कळमनुरी तालु्क्यातील डोंगरकडा येथे वीज पुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने संतप्त गावकऱ्यांनी रविवारी सकाळी 11.30 वाजेच्यादरम्यान, विज कंपनीच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडून ठेवले. त्यानंतर पोलिस आल्याने खिडकीतूनच गावकरी व अभियंत्यांमधे चर्चा सुरु होती. दुपारी साडेतीन वाजता लेखी आश्‍वासनानंतर चार तासाने कुलुप उघडण्यात आले.

कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील गावकऱ्यांनी चार महिन्यापुर्वी वीज कंपनीच्या अभियंत्यांकडे खांब बदलून देणे, वीज वाहिन्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. मात्र सदरील मागणीकडे अभियंताने दुर्लक्ष केले. डोंगरकडा गावात मागील काही दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. सकाळ पासून रात्री आकरा वाजेपर्यंत वीज पुरवठा चालु बंद होत होता. तर रात्री अकरा वाजता वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर पहाटे पाच वाजता सुरळीत होत होता.

या प्रकाराला कंटाळून आज गावकरी पप्पू अडकिणे, रावसाहेब अडकिणे, जनार्धन गावंडे, डिगांबर गावंडे, विजय गावंडे, मारोती पंडीत, उध्दव गावंडे, किशन अडकिणे, गोविंद गावंडे याच्यासह गावकऱ्यांनी आज सकाळी साडे आकरा वाजता विज कंपनीचे कार्यालय गाठले.

समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ठोकले कुलूप
संतप्त गावकऱ्यांनी या मागणीसाठी अभियंता इ. डब्लू. जाधव यांच्याशी चर्चा केली. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त गावकऱ्यांनी वीज कंपनीच्या कार्यालयाला कुलुप ठोकले. यावेळी अभियंता जाधव व सुमारे 10 कर्मचारी कार्यालयात होते. दरम्यान, संबंधित

घटनेची माहिती जाधव यांनी भ्रमणध्वनीवरून आखाडा बाळापूर पोलिसांना दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रविकांत हुंडेकर, जमादार भगवान वडकिले, प्रभाकर भोंग, नागोराव बाभळे यांनी डोंगरकडा येथे धाव घेतली. त्यानंतर गावकरी व वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांमधे चर्चा घडवून आणली. दुपारी साडेतीन वाजता वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विज पुरवठा सुरळीत करणे व इतर कामे आठ ते 15 दिवसांत करण्याचे लेखी आश्‍वासन दिले. विशेष म्हणजे त्यांचे लेखी आश्‍वासनही गावकऱ्यांनी खिडकीतूनच स्विकारले. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले.

...तर यापेक्षा तिव्र आंदोलन करणार - पप्पू अडकिणे
वीज पुरवठ्या सोबतच गावातील विजेचे खांब बदलणे, डोंगरकडा फाटा येथील वीज पुरवण्याचे फिडर वेगळे करणे या मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही कामे केली जात नव्हते. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले असल्याचे पप्पू अडकिणे यांनी सांगितले. लेखी आश्‍वासनानंतर मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास या पेक्षा तिव्र आंदोलन केले जाईल असेदेखील त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...