आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने एमएस्सीतील तीन अभ्यासक्रमांचे रिड्रेसल (पुर्मूल्यांकन) निकाल अद्याप जाहीर केले नाहीत. नापासांनी २२ डिसेंबरपासून संबंधित विषयांच्या परीक्षाही दिल्या आहेत. तरीही निकाल लावले नाहीत. त्यामुळे परीक्षा अर्ज शुल्क आणि रिड्रेसल शुल्क अशा दोन प्रकारचा आर्थिक भुर्दंड विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा जून-२०२२ मध्ये घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल ७ ऑक्टोबरला जाहीर केला गेला. यंदाच्या शैक्षणिक सत्रात विक्रमी विद्यार्थी नापास झाले होते. त्यामुळे निकालानंतर विद्यापीठाने ७ ते १५ ऑक्टोबरपर्यंत रिड्रेसलसाठी अर्ज मागवले होते. एका विषयासाठी झेरॉक्सला १०० रुपये, तर रिड्रेसल शुल्कापोटी २०० असे एकत्रित ३०० रुपये घेतले गेले. १५ ऑक्टोबरनंतर १० दिवसांनी म्हणजेच २५ ऑक्टोबरपर्यंत निकाल घोषित करणे अपेक्षित होते. पण, रिड्रेसलसाठी अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवसानंतर ७० दिवस उलटले. तरीही निकाल लागले नाहीत. दरम्यान, नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले. २२ डिसेंबरपासून संबंधित विषयांचे पेपरही झाले आहेत. पण पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर झाले नाहीत.
दीड हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न : एमएस्सी (रसायनशास्त्र) एक हजार जणांनी रिड्रेसल अर्ज केले. त्यापैकी ७०० जणांनी पुनर्मूल्यांकनासाठी सादर केले. एमएस्सी (गणित) अभ्यासक्रमांच्या ही ५०० जणांनी अर्ज केले. ३०० जणांनी पुन्हा मूल्यांकनासाठी आणून दिले. एमएस्सी (संगणकशास्त्र) प्रथम वर्षाच्या ५० जणांनी अर्ज केले होते. त्यांचेही निकाल प्रलंबित असल्याची माहिती आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या मते पुनर्मूल्यांकनासाठी आम्ही त्या-त्या प्राध्यापकांना मूल्यांकनासाठी बोलवले, पण त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही, म्हणून निकालास उशीर झाला. पण आता काही दिवसांत निकाल जाहीर केले जातील, असेही सांगण्यात आले आहे.
आमचे शुल्क परत द्यावे
रिड्रेसलचे निकाल १० दिवसांत जाहीर केले असते, तर आम्हाला परीक्षा अर्ज भरण्याची गरज पडली नसती. आम्हाला परीक्षा शुल्क व रिड्रेसलचे शुल्क भरावे लागले. मुद्दा फक्त पैशांचा नाहीये. चार दिवसआधी रिड्रेसलला अर्ज केलेल्या पेपर देण्याची सूचना केली जाते. चार दिवसांत अभ्यास कसा करावा ?, आमचे रिड्रेसलचे शुल्क परत करावे, असे ऋतिका महाजन या विद्यार्थिनीने म्हटले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.