आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून गणिताच्या पेपरमध्ये लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने विद्यार्थी चक्क उत्तरपत्रिका घेऊन पळाल्याची घटना शुक्रवारी दुपारी नागसेन माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावर घडली. त्यानंतर पोलिसांनी त्या विद्यार्थ्याला दीड तासाने एका अभ्यासिकेतून पकडून आणले. त्याने पळवलेली उत्तरपत्रिका जवळच्या अभ्यासिकेत ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी १७ वर्षीय विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
३ मार्च रोजी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत गणित आणि संख्याशास्त्र विषयाचा पेपर होता. दुपारी २ वाजता पेपर सुटण्यासाठी दहा मिनिटे बाकी असताना नागसेन माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावरील एका विद्यार्थ्याने पर्यवेक्षकांना लघुशंकेस जाण्याची परवानगी मागितली. मात्र, पेपर सुटण्यासाठी दहाच मिनिटे बाकी आहेत. त्यामुळे पर्यवेक्षिकेने नंतर जा, असे म्हटल्यानंतर विद्यार्थी ओटीपोट धरून उभा राहिला अन् पळून गेला. यामुळे पर्यवेक्षिका ओरडल्या, सर, विद्यार्थी पळाला.
त्यानंतर त्यांनी टेबलवर जाऊन पाहिले असता, तेथे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेतील फक्त १३ नंबरचेच पान शिल्लक होते. इतर पाने नव्हती. हा प्रकार तत्काळ पोलिसांना कळवला. पोलिसांनी त्या विद्यार्थ्याच्या मागे-पुढे बसणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी केली तर तो पेपरला येण्यापूर्वी टेन्शनमध्ये असल्याचे मित्रांनी सांगितले. याप्रकरणी केंद्र प्रमुख रविराज चव्हाण यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणेज परीक्षार्थी वैजापूर येथील शिक्षकांचा मुलगा असून, चांगल्या शिक्षणासाठी त्याला शहरात ठेवले आहे. १३ पोलिसांनी ३ तास त्याची कसून चौकशी केली.
परीक्षा केंद्रावरील स्वच्छतागृहात पाणी नव्हते, असे त्याने पोलिसांना सांगितले तो विद्यार्थी पोलिसांना म्हणाला, ‘ येथील केंद्रावर स्वच्छतागृहात पाणी नव्हते, म्हणून तिकडे गेलो होतो.’ परंतु, उत्तरपत्रिकेची पाने मी फाडली नाहीत. परंतु, तो परत आला तेव्हा उत्तरपत्रिकेची पाने उसवल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्याच्या पालकांना बोलावून घेतले. हा प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर पालकांनीदेखील त्याची समजूत काढत उत्तरपत्रिका कुठे ठेवली, याची विचारणा केली.
तो उत्तरपत्रिका फाडेपर्यंत पर्यवेक्षक, बैठे पथक करत काय होते...? परीक्षा कक्षात विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याचे काम पर्यवेक्षकांचे असते. वर्गात कोणताही गैरप्रकार घडू नये, याची जबाबदारीदेखील पर्यवेक्षकांची असते. मग, या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेची शिलाई काढून एकच पान शिल्लक ठेवले, तोपर्यंत पर्यवेक्षकांचे त्या विद्यार्थ्याकडे लक्ष नव्हते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उत्तरपत्रिका अभ्यासिकेत वेदांतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाचे वय १७ वर्षे ४ महिने असून त्याच्यावर चोरीचा (३७९), महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ माल प्रॅक्टिस अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी केंद्र प्रमुख रविराज चव्हाण यांनी फिर्याद दिली. आरोपी विद्यार्थी मूळ वैजापूर तालुक्यातील शिवराई गावाचा आहे. पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक सुधाकर पाटील तपास करीत आहेत.
बोर्डाच्या नियमानुसार कारवाई होऊ शकते परीक्षा केंद्रावर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेवर अनाधिकृतरीत्या बदल करणे, लिहिलेली उत्तरपत्रिका बाहेर घेऊन जाणे किंवा बाहेरून लिहून आणणे, एका विद्यार्थ्याऐवजी दुसऱ्याने पेपर अथवा परीक्षा देणे (तोतयागिरी करणे), तसेच परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्याबरोबर प्रक्षोभक व्यवहार करणे आदी गैरमार्गप्रकरणी शिक्षा सूचीप्रमाणे संबंधितांची संपूर्ण परीक्षेची परवानगी रद्द करून त्यांना त्या पुढील पाच परीक्षांना बसण्यास प्रतिबंध करता येतो. मात्र, शिक्षण मंडळाने रात्री उशिरापर्यंत या विद्यार्थ्यावर बोर्डाच्या नियमानुसार कारवाई केलेली नव्हती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.