आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता:मंत्री शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचे कुटुंबीय म्हणतात आमच्यासाठीही धक्कादायक गोष्ट; परिवारांसोबत बोलणेच नाही

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेना सोडत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. औरंगाबादमध्ये पाच आमदार गेल्यामुळे औरंगाबादसाठी धक्कादायक ठरले. मात्र जे आमदार गेले, त्यांच्या पाल्यांना मात्र वडील कुठे आणि कधी गेले याचा काहीच थांगपत्ता नाही. काहींचे एक दिवस तर काहींचे २ ते ३ दिवस अगोदर बोलणे झाले, अशी प्रतिक्रिया त्यांच्या मुलांनी दिली आहे.

मी कालच परदेशातून आलो, तेव्हापासून वडिलांशी बोलणेच नाही : ऋषिकेश
ऋषिकेश जैस्वाल यांनी दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले की, मी सोमवारी रात्रीच सिंगापूर वरुन मुंबईला आलो होतो. त्यानंतर मुंबईवरून सकाळी मी औरंगाबादला आलो. आमचादेखील कालपासून प्रदीप जैस्वाल यांच्याशी संपर्क झालेला नाही. मी देखील फोन लावत असून त्यांचा मोबाईल बंद येत आहे. जैस्वाल शिवसेना सोडून जाण्याच्या बाबत विचारले असता, ‘मी एकाच वाक्याच सांगतो, मी उद्धव ठाकरे साहेबांसोबत असेल.’

मी तर दिंडीच्या प्रस्थानतच होतो : विलास भुमरे
पैठणचे आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास भुमरे म्हणाले की, मी गेले तीन दिवस एकनाथ महाराजांच्या दिंडीच्या प्रस्थान आणि दिंडीच्या कार्यक्रमाच्या तयारीत होतो. त्यामुळे माझे वडिलांशी तीन दिवसापूर्वीच बोलणे झाले होते. मी त्यांना फोन केला, तर आता त्यांचा फोन स्विच ऑफ येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नको, अशी सर्वांची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकांचे फोन आले तेव्हाच मलादेखील कळाले : सिद्धांत
माजी नगरसेवक सिद्धांत सिरसाठ म्हणाले की, माझे आणि वडीलांचे तीन दिवसापुर्वी बोलणे झाले होते. मी एका कामानिमित्ताने हैदराबादला आलो आहे. मला देखील लोकांचे फोन आले, तेव्हाच मला कळाले. मी त्यांना फोन लावला तेव्हा त्यांचा मोबाईल बंद होता. दुसरीकडे, मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र समिर सत्तार यांचा मोबाईल बंद होता.