आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:शेतकऱ्याने मागितली नक्षलवादी होण्याची परवानगी, प्रशासनासह मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवले पत्र

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • ३५३च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी- नामदेव पतंगे, शेतकरी ताकतोडा

साहेब, विकलं तेच पिकलं हि योजना सुरु केली, मात्र पिकलंच नाही तर विकणार काय, अजूनही बँकेचे अधिकारी कर्ज भरण्यासाठी तगादा लावत आहे, विद्युतपंपाचा विज पुरवठा खंडीत केला आहे. या परिस्थितीत जगणे कठीण झाले असून आता नक्षलवादी होण्याची परवानगी द्यावी अशी अफलातून मागणी ताकतोडा (ता.सेनगाव) येथील शेतकरी नामदेव पतंगे यांनी केली आहे.

या संदर्भात पतंगे यांनी मुख्यमंत्री कार्यालयासोबतच तहसील प्रशासनाकडे पत्र पाठविले आहे. शेती हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. शेतावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र मागील काही वर्षात शेतीमध्ये लागवडीचा खर्चही निघाला नाही. शासनाची कर्जमाफीची योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचलीच नाही. एवढेच नव्हे तर शासनाने विकल तेच पिकल हि योजना हाती घेतली. मात्र यामध्ये पिकलच नाही तर विकणार काय असा सवाल उपस्थित केला आहे.

जिल्हयातील अनेक शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे बँकेकडे धुळखात पडलेली आहेत. बँकेकडून पिककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर मागील कर्ज वसुलीसाठी बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहे. त्यातच भर म्हणजे विद्युत पंपाचा विज पुरवठा खंडीत करण्याचा सपाटा विज कंपनीने सुरु केला आहे. आता गहू व इतर पिकांना पाणी देण्याची वेळ असतांना विज पुरवठा खंडीत केला जात असल्याने गव्हाचे पिक देखील हाती येणार नाही. विज कंपनीकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. यावर्षीही बँका पिककर्ज देण्यास तयार नाहीत त्यामुळे नक्षलवादी होण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे. या अफालातून पत्रामुळे सेनगाव तहसील प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. या संदर्भात सेनगावचे तहसीलदार जिवककुमार कांबळे यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते बैठकीत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

३५३च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी- नामदेव पतंगे, शेतकरी ताकतोडा

बँकेकडे पिककर्जा बाबत विचारणा करण्यासाठी गेल्यास उध्दट वागणुक मिळते. विद्युतपंपाची विज पुरवठा खंडीत करणाऱ्यांकडे विचारणा केल्यास सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी मिळते. मग या परिस्थितीत शेतकऱ्यांनी बँक, विज कंपनी व कृषी विभागाला काहीच विचारायचे नाही काय.

बातम्या आणखी आहेत...