आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:संचारबंदी डावलून जिथे खासदार इम्तियाज थिरकले ते फार्महाऊस सील; ‘दिव्य मराठी’च्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इतर पक्षांवर कारवाई नाही, मग आमच्यावरच का? : इम्तियाज

काेराेना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने वीकेंडला लागू केलेला संचारबंदीचा नियम धाब्यावर बसवून शनिवारी (३ जुलै) रात्री दाैलताबादेतील अंबर या खासगी फार्महाऊसवर कव्वालीचा कार्यक्रम आयाेजित केला हाेता. विशेष म्हणजे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह सुमारे १५० ते २०० लाेक या कार्यक्रमात सहभागी झाले हाेते. स्वत: खासदारांनी कव्वालीवर ठेका धरल्यानंतर त्यांच्यावर नाेटांची उधळणही करण्यात आली हाेती. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने आयाेजकांसह ५० ते ६० जणांवर गुन्हे दाखल केले हाेते.

दैनिक दिव्य मराठीने ५ जुलैच्या अंकात याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित करून खासदारांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले हाेते. अखेर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत साेमवारी दुपारी संबंधित फार्महाऊस सील करण्याचे आदेश दिले. दरम्यान, सायंकाळी ६ वाजता या फार्महाऊवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती अप्पप तहसीलदार निखिल धुळधर यांनी दिली.

ज्या ठिकाणी हा कव्वालीचा कार्यक्रम झाला ते अंबर फार्महाऊस दौलताबाद-औरंगाबाद रोडवर अब्दीमंडी येथील गट क्रमांक ४० मध्ये आहे. रफिक खान करीम खान (४०) हे त्याचे मालक आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर साेमवारी दाैलताबादचे तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक तसेच पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत पंचनामा करून फार्महाऊस सील करण्यात आले. या फार्महाऊसच्या मालकाला किती दंड करणार याबाबतचा निर्णय नंतर घेतला जाईल, अशी माहिती धुळधर यांनी दिली.

इतर पक्षांवर कारवाई नाही, मग आमच्यावरच का? : इम्तियाज
औरंगाबाद | दाैलताबाद येथे शनिवारी रात्री संचारबंदीचे नियम झुगारून कव्वालीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले खासदार इम्तियाज जलील यांना अापल्या चुकीबद्दल यत्किंचितही पश्चात्ताप जाणवला नाही. उलट ‘इतर पक्षांचे लाेकही नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यांच्यावर कारवाई हाेत नाही, मग आमच्यावरच का?’ काेराेना निर्बंधांच्या बाबतीत इतर पक्षांसाठी व एमआयएमसाठी वेगळा कायदा आहे का?’ असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. यापूर्वी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेश कार्यक्रमातही माेठ्या प्रमाणावर गर्दी जमवून नियमांचे उल्लंघन झाले. मग त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तत्परता प्रशासनाने दाखवली नाही. अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, असा आराेपही इम्तियाज यांनी केला. दाैलताबादेतील “कव्वालीचा कार्यक्रम काेराेना काळात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी ठेवला हाेता. तिथे एका कार्यकर्त्यांने पैसे ओवाळले. याचा अर्थ उधळण केली असा हाेत नाही. ते पैसे का माझ्या खिशात येणार होते का?’ असा प्रतिप्रश्न करत इम्तियाज यांनी नियमांचे उल्लंघन करण्याच्या आपल्या भूमिकेचे समर्थनच केले.

खासदारांवर कारवाईचा निर्णय चित्रफीत पाहून
या प्रकरणात आयाेजकांसह ५० उपस्थितांवर गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. मात्र खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. सामान्य जनतेला एक न्याय व लोकप्रतिनिधीना वेगळा न्याय का, असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, ‘फार्महाऊसवरील कार्यक्रमाची चित्रफीत तपासण्याचे काम पोलिस करत आहेत. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. नियमापेक्षा अधिक लोक फार्महाऊसवर एकत्र येऊन अशा पद्धतीने कार्यक्रम करत असतील तर त्यांच्यावर कारवाई हाेणारच,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...