आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीव धोक्यात:‘सचखंड’मधील अग्निशमन यंत्रणाच एक्स्पायर्ड; रेल्वेचा यंत्र रिफिलचा दावा; मध्य प्रदेशातील आपत्ती व्यवस्थापन जवानाने आणले समोर

हिंगोली6 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
 • कॉपी लिंक
सचखंड एक्स्प्रेसमधील कालबाह्य अग्निशमन यंत्रणा. - Divya Marathi
सचखंड एक्स्प्रेसमधील कालबाह्य अग्निशमन यंत्रणा.
 • ‘सचखंड’मधील अग्निशमन यंत्रणाच एक्स्पायर्ड; रेल्वेचा यंत्र रिफिलचा दावा

नांदेड येथून अमृतसरकडे धावणाऱ्या सचखंड एक्स्प्रेसमधील वातानुकूलित डब्यातील अग्निसुरक्षेची यंत्रणा मुदतबाह्य झाली अाहे. अागीची एखादी दुर्घटना झाल्यास माेठी जीवितहानी व नुकसान हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाेपाळ ते अाैरंगाबाद प्रवास करताना मध्य प्रदेशमधील अापत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान बालासाहेब खिस्ते यांना मुदतबाह्य अग्निसुरक्षा यंत्रणेतील त्रुटी दिसल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती “दिव्य मराठी’ला दिली. दुसरीकडे, अग्निशमन यंत्रांचे वेळेवर रिफिलिंग केले असून यंत्रावर स्टिकर लावायचे राहून गेल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले. नांदेड ते अमृतसर या लांब पल्ल्याची रेल्वे दक्षिण मध्ये रेल्वेमार्फत चालवली जाते. या रेल्वेत दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब व हरियाणा या पाच राज्यांतून २०८७ किलोमीटर ही गाडी धावते. सुमारे ३४ तास ५० मिनिटांचा हा प्रवास असून गाडीला १९ डबे अाहेत. त्यात ४ वातानुकूलित, १२ स्लीपर कोच तर ३ जनरल कोच असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बालासाहेब खिस्ते हे जवान सचखंड एक्स्प्रेसमधून औरंगाबादपर्यंत प्रवास केला. या प्रवासामध्ये त्यांना एसी टू टायर डब्यातील अग्निशमन यंत्र चक्क मुदतबाह्य झाल्याचे अाढळून अाले. या डब्यातील अग्निशमन यंत्र ६ जानेवारी २०२१ रोजी मुदतबाह्य झाले, तर बी-२ या एसी थ्री टायर कोचमध्ये या यंत्रावर कुठल्याही प्रकारची माहिती नोंदवलेली नसल्याचे खिस्ते यांना दिसून अाले. अनेक ठिकाणी या यंत्रावर गंज चढलेला अाहे. त्यामुळे या रेल्वेत आगीची दुर्घटना घडल्यास त्यात जीवितहानीसह माेठे नुकसान हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गाडीत अशी असायला हवी यंत्रणा

रेल्वेमध्ये साधारणत ः ए ते डीपर्यंतची सर्व अग्निशमन यंत्रे हवी. मात्र त्या ठिकाणी केवळ ए ते सीपर्यंतचीच यंत्रे आढळून अाली.

 • ए यंत्र- कागद, पेपर, लाकूड यावरील आग विझविता येते.
 • बी- पेट्रोल, डिझेल, केरोसीनमुळे लागलेली आग विझविता येते.
 • सी- गॅसमुळे लागलेली आग विझविता येते.
 • डी- मेटलमुळे लागलेली आग विझविता येते.
 • ई- इलेक्ट्रिसिटीमुळे लागलेली आग विझविता येते.

यंत्राचे पाइप वेळीच बदलणे आवश्यक

 • रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातील एसी यंत्रणा २४ तास सुरू असते.
 • याच ठिकाणी सॉकेट, पॅनेल असल्याने आग लागण्याची मोठी शक्यता असते.
 • अग्निशमन यंत्राला एक वर्षानंतर रिफिल करावे लागते.
 • प्रेशर गेज मीटरचा काटा नेहमी हिरव्या रंगावर असावा. त्यात गॅस व प्रेशर लक्षात येते.
 • यंत्राचे पाइप दर महिन्याला बदलणे आवश्यक आहे.
 • रिफिलिंग केल्यानंतर त्याचे प्रेेशर तपासणे आवश्‍यक.

गाडीतील काही यंत्रांना स्टिकर नाहीत

या संदर्भात रेल्वेच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाशी चर्चा केली आहे. त्यांनी सर्व अग्निशमन यंत्रांची रिफिलिंग केली आहे. नियमितपणे व वेळेत यंत्राची रिफिलिंग केली जाते. काही ठिकाणी स्टिकर लागत नसल्याने त्याबाबत कंत्राटदारांना सांगितले आहे. - राजेश शिंदे, जनसंपर्क अधिकारी, दक्षिण मध्य रेल्वे विभाग नांदेड.

अग्निशमन यंत्रणा कालबाह्य असल्याने एखादी दुर्घटना घडू शकते. प्रवाशांनीही त्यांच्या पातळीवर दक्षता घेतली पाहिजे. आगीची घटना घडल्याचे लक्षात येताच तातडीने रेल्वे थांबविण्यासाठी चैन अोढावी. आगीमुळे धुर जास्त असेल तर जमीनीवर झोपून जावे. धूर जमिनीपासून एक फुट उंचीवरून पसरतो त्यामुळे झोपणे हा याेग्य पर्याय आहे. तसेच ओला रुमाल करून नाकावर व तोंडावर बांधवा. आगीची दुर्घटना झाली तर प्रवाशांनीही योग्य काळजी घेतली तर हानी होणार नसल्याचे बालासाहेब खिस्ते यांनी “दिव्य मराठी’ला सांगितले.

बातम्या आणखी आहेत...