आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:12 ते 18 वयोगटातील 57% मुलांना पहिला डोस ; शाळा सुरू झाल्याने लसीकरण मोहीम पुन्हा सुरू होणार

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण हाच उपाय असल्याने लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. आतापर्यंत १२ ते १८ वयोगटातील ५७ टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शाळा बंद असल्याने लसीकरणात अडथळे होते. आता शाळा सुरू होत असल्याने पुन्हा लसीकरण मोहीम सुरू करण्यात येईल, अशी माहिती जि.प. आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी दिली. औरंगाबाद जिल्हयात १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला १६ मार्चपासून सुरुवात झाली होती. मात्र शाळांना उन्हाळी सुट्या लागल्याने आणि लस हव्या त्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण थांबले होते. शिक्षण विभागास लसीकरण करून घेण्यासंदर्भात सूचित करण्यात आले होते. परंतु सुट्यांमुळे शिक्षण विभागाकडूनही हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता शाळा सुरू झाल्याने शंभर टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्यात येईल, असे डॉ. शेळके यांनी सांगितले. १२ ते १४ वयोगटातील ग्रामीण भागातील ९२,९८३ तर शहरातील ४५,२५५ असे एकूण १ लाख ३८ हजार २३८ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य आहे. आतापर्यंत ७८ हजार ९६३ विद्यार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे, तसेच यापैकी २५ हजार ५९८ जणांचा दुसरा डोस झालेला आहे. पहिला डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ५७ टक्के आहे. चौथ्या लाटेची शक्यता कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता असल्याचे राज्य शासन, प्रशासनाकडून वर्तविण्यात आले आहे. या चौथ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका राहील, असा अंदाजही वर्तविला जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने मुलांच्या लसीकरणासाठी नियोजन केले आहे. शाळा सुरू झाल्यामुळे आता लसीकरणाला आणखी वेग येईल. - डॉ. सुधाकर शेळके, जि.प. आरोग्य अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...