आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:शहरात उभारले राज्यातील पहिलेच महिला कोविड केअर सेंटर, महिला वैद्यकिय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीत कोविडची लागण झालेल्या महिला रुग्णांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले असून या ठिकाणी महिला वैद्यकिय अधिकारी व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या पुढाकारातून हे केअर सेंटर सुरु झाले आहे. राज्यातील पहिलेच कोविड सेंटर असल्याचे बोलले जात आहे.

हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांत कोविड रुग्णांची संख्या दिवसें दिवस वाढू लागली आहे. मागील पंधरा दिवसांत रुग्णांचा आकडा चांगलाच वाढला असून आता पर्यंत तब्बल ५१०९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४६०५ रुग्ण बरे होऊन त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर सध्याच्या स्थितीत ४३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, कोविड रुग्णांमध्ये महिला रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या एकुण रुग्णांपैकी सुमारे ३० टक्के महिला रुग्ण आहेत. त्यामध्ये काही महिला रुग्ण गंभीर आहेत तर काही महिला रुग्णांना गंभीर लक्षणे नाहीत. या रुग्णांवर शासकिय रुग्णालयातच उपचार केले जात आहेत.

दरम्यान, हिंगोलीत महिलांसाठी स्वतंत्र कोविड केअर संेंटर सुरु करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घेतला होता. ज्या महिला रुग्णांना गंभीर लक्षणे नाहीत त्यांना उपचारासाठी कोविड केअर सेंटर मध्ये ठेवण्याबाबत आरोग्य विभागाशी त्यांनी चर्चाही केली. त्यानंतर जिल्हा परिषदेेच मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात हा मुद्दा मांडला. त्यामध्ये महिलांसाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्यावर एकमत झाले.

त्यानुसार हिंगोली शहरालगत लिंबाळा भागात अल्पसंख्याक मुलींच्या वसतीगृहामध्ये हे सेंटर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी १०० रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली असून तातडीची गरज भासल्यास ऑक्सीजन सिलेंडर देखील ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी महिला रुग्णांवर उपचार करण्यासाठी महिला वैद्यकिय अधिकारी तसेच महिला आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोविडची लक्षणे असलेल्या महिला रुग्णांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर राज्यातील पहिलेच केअर सेेंटर असल्याचे बोलले जात आहे.

पाच महिला रुग्ण उपचारासाठी दाखल ः रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी हिंगोली

हिंगोलीत सुरु करण्यात आलेल्या महिला कोविड केअर सेंटरमध्ये सध्या पाच महिला रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोविडची गंभीर लक्षणे नसलेल्या महिला रुग्णांना या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. पुढील काळात अत्याधुुनिक सुविधा या ठिकाणी देण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...