आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्र शासनाद्वारे आयोजित प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थीस्तरीय घरकुल स्पर्धेत राज्यातून निवडलेल्या तीन लाभार्थ्यांमध्ये हिंगोलीच्याच तिघांची निवड झाली आहे. त्यामुळे हिंगोली पालिकेने थेट केंद्राच्या स्पर्धेत आपला झेंडा रोवला आहे. या लाभार्थ्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच सत्कार केला जाणार आहे.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सन २०२०-२१ या वर्षीत संपूर्ण देशात घरकुल स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये राज्यस्तरीय, नगरपालिका, महानगर पालिका व लाभार्थीस्तर या संवर्गातून हि स्पर्धा घेण्यात आली होती. त्यानुसार देशभरातून या स्पर्धेसाठी प्रत्येक राज्यांनी, महानगर पालिका व नगरपालिका तसेच लाभार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये घरकुल लाभार्थीस्तरावर प्रत्येकी दहा घरकुल लाभार्थ्यांनी बांधलेल्या घरकुलांचे छायाचित्रीकरण करून केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले होते. यामध्ये हिंगोली पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, विजय ईटकापल्ले, स्वाती अंतापुरकर, संघपाल नरवाडे, कमलेश इंगळे यांच्या पथकाने हिंगोली शहरातील १० घरकुलांचे छायाचित्रीकरण करून केंद्र शासनाकडे पाठविले होते.
या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहिर झाला आहे. यामध्ये राज्यातून लाभार्थीस्तरीय स्पर्धेत निवडण्यात येणाऱ्या ३ घरकुल लाभार्थ्यांमध्ये हिंगोलीच्याच लाभार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये सुमन बोरकर, शोभा मुंडे, जिजा लोथो या लाभार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातून लाभार्थीस्तरीय निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये हिंगोली पालिका एकमेव पालिका ठरली आहे. त्यामुळे हिंगोली पालिकेने राज्यासह दिल्ली दरबारी आपला झेंडा रोवला आहे. पुढील काही दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या लाभार्थ्यांचा सत्कार केला जाणार असल्याचे पालिकेच्या सुत्रांनी सांगितले. हिंगोलीच्या या लाभार्थ्यांचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्यासह नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेची परिणामकारक अंमलबजावणी ः डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी हिंगोली पालिका
प्रधानमंत्री आवास योजनेची हिंगोली पालिकेने परिणामकारक अंमलबजावणी केली आहे. या योजनेतून घरकुल लाभार्थ्यांकडून घरकुलाचे काम दर्जेदार होण्यासाठी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी बांधकामाला वेळोवेळी भेटी देतात. यापुढेही या योजनेमध्ये दर्जेदार घरकुले बांधण्यासाठी पालिकेचा प्रयत्न असणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.