आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाची लागण झालेले लोक इतर जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने येत आहेत. त्यांच्यामुळे होणारा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजनांची घोषणा केली. त्यात शहरात येणाऱ्या प्रवाशांची प्रवेश मार्गावर अँटिजन टेस्ट केली जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार टीम दिव्य मराठीने चार प्रवेश मार्गांवर पाहणी केली. तेव्हा प्रवासी तयार पण तपासणी पथकच नसल्याचे दिसून आले. कोणतेही नियोजन नसल्याने पहिल्याच दिवशी या योजनेचा फज्जा उडाला. त्याचा हा ग्राउंड रिपोर्ट.
पडेगाव : मुंबई नाका : वेळ : सकाळी ११ वाजता : खुलताबाद, दौलताबाद, माळीवाडा यासह इतर ठिकाणांहून लोक दुचाकी, तीनचाकीने शहरात येत होते. मनपा नागरी मित्र पथकातील कर्मचारी एम. बी. सहाने, जनार्दन सांगळे यांनी त्यातील विनामास्क लोकांवर कारवाई केली. काही जणांकडून दंड वसूल केला. काही जणांना समज देऊन सोडण्यात आले. बहुतांश वाहनचालक पथकाला दाखवण्यापुरते तोंडावर रुमाल, मास्क घेत होते. काही जण वेगात वाहने चालवत शहरात शिरले. दरम्यान, बाहेरगावाहून येणाऱ्यांची संख्या वाढत चालली, दुपारचे दोन वाजले तरी आरोग्य पथकाचा पत्ताच नव्हता. सकाळी आरोग्य कर्मचारी येतील, असे आम्हाला मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते, आम्हीही त्यांची वाट पाहत आहोत, असे नागरी मित्र पथकातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
हर्सूल टी पॉइंट : दुपारी एक वाजता : दुपारी दोन वाजता तपासणी सुरू झाली. पहिल्या तपासणीतच दोघे पॉझिटिव्ह आढळले. चार वाजेपर्यंत हा आकडा सहावर गेला होता. त्यांना मनपाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. वाहनचालकांना रोखण्यासाठी नागरी मित्र पथक, पोलिसांची मदत घेण्यात आली.
लोक सांगतात अशी कारणे
पडेगाव-मुंबई नाका येथे दुचाकीस्वार जनार्दन तायडे म्हणाले की, पत्नीला दवाखान्यात जाण्याची गडबड असल्याने मास्क घातला नाही. बाळू राठोड म्हणाले की, मी आणि माझ्या मित्राला बांधकाम ठेकेदाराने बोलावून परत पाठवले. त्यामुळे आम्ही मास्क वापरला नाही.
नियोजनासह तांत्रिक अडचण
सकाळपासून तपासणी करण्याचे नियोजन होते. पण नियोजनात थोडी गडबड झाली. काही तांत्रिक अडचणीही होत्या. त्या दूर करून दुपारी, सायंकाळी तपासणी सुरू झाली. आता २४ तास पथके तैनात असतील. - डॉ. मेघा जोगदंड, वॉररूम प्रमुख
बारा जण पॉझिटिव्ह
दरम्यान, चिकलठाणा येथे १७ जणांच्या तपासणीत दोन, हर्सूल टी पॉइंटवर ४१ तपासणीत सहा तर कांचनवाडी येथे ४३ मध्ये चार पॉझिटिव्ह आढळले, असा दावा मनपा आरोग्य विभागाने केला. उर्वरित नाक्यांवर सोमवारपासून तपासणी होईल, असेही सांगण्यात आले.
केंब्रिज-बायपास : सकाळी ११ वाजता
केंब्रिज चौकात एक पत्र्याचा शेड तयार होता. तेथे मनपाचे दोन कर्मचारी, एक स्मार्ट बस व चालक, दोन नागरी मित्र दिवसभर हजर होते. मात्र, सायंकाळपर्यंत एकही तपासणी झाली नाही. दुपारी तीन वाजेच्या सुमारास कंपनीतील एक कर्मचारी आले आणि तपासणीची विनंती केली. तेव्हा त्यांना सध्या सुविधा नाही. तुमचा मोबाइल क्रमांक द्या. सुविधा सुरू झाल्यावर कळवतो, असे उत्तर मिळाले. बीड बायपास येथे सायंकाळी शेड उभारणीचे काम सुरू होते. शुक्रवारी वीज नसल्यामुळे शेड उभारणी झाली नाही. म्हणून उद्यापासून कदाचित तपासणी सुरू होईल, असे उत्तर तेथील कर्मचाऱ्याने दिले.
गोलवाडी नाका : दुपारी २ वा.
औरंगाबाद शहरात सर्वाधिक प्रवासी पुणे, अहमदनगर येथून येतात. त्यामुळे गोलवाडी नाक्यावर आरोग्य पथक सकाळी सहा वाजेपासूनच कार्यरत असेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. यापूर्वी येथे केंद्र होते. मधल्या काळात ते बंद झाले होते. त्याची साफसफाई करण्यासाठी मनपाचे कर्मचारी आले. त्यांनी केंद्राचे प्रवेशद्वार व बाहेर पडण्याच्या मार्गावरील सिमेंटचे खांब काढले. वीज, पाणी आदींची व्यवस्था केली. मग आरोग्य कर्मचारी आले आणि तपासणीच्या प्रतीक्षेतील प्रवाशांकडे दुर्लक्ष करत तीन वाजता निघून गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.