आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे बिग स्टोरी:नामकरणाचे घाट आणि विस्मरणाचा परिपाठ; एकाच रस्त्यांना दोन ते तीन नावे, ओळख मात्र जुन्या नावाचीच

छत्रपती संभाजीनगर / फेरोज सय्यदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नामकरण हा सध्याचा चर्चेचा विषय आहे. यापूर्वी शहरातील अनेक रस्ते आणि चौकांचे नामकरण करण्यात आले. विशेष म्हणजे एकाच रस्त्याचे एकापेक्षा अधिक वेळा नामकरणही करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र ती प्रक्रिया तत्कालीन राजकीय आंदोलन किंवा पाट्या लावण्यापुरता सोहळा एवढीच मर्यादित राहिलेली दिसते. गेल्या १५ वर्षांत शहरातील रस्ते, पूल आणि चौक यांच्या नामकरणाबाबत दिव्य मराठीने पडताळणी केली असता ती केवळ पाट्यांपुरती औपचारिकता उरल्याचे दिसून आले.

रस्ता क्र. 6 : कर्वे गुरुजी मार्ग औरंगपुरा पोलिस चौक ते एसबी कॉलेज रोडला कर्वे गुरुजी मार्ग असे नाव आहे. येथील लोकप्रिय पूर्णानंद या दुकानाचे मालक कर्वे गुरुजींच्या दुकानाच्या पाटीवर कर्वे गुरुजी मार्ग लिहिले आहे. पूर्वी पोलिस चौकीजवळ या नावाची पाटी होती. रस्ता रुंदीकरणात ती काढून टाकण्यात आली. या रस्त्याला नाथ मंदिर रोड किंवा एसबी रोड असे म्हटले जाते. रस्ता क्र. 7 : बाबा दळवी मार्ग जालना रोडवरील हॉटेल रामगिरी ते कॅनॉटकडे जाणाऱ्या रस्त्याला पत्रकार बाबा दळवी यांचे नाव आहे. तशी पाटीही रस्त्यावर दिसते. पण हे नाव कुणालाच माहीत नाही. हा रस्ता कॅनॉट किंवा रामगिरीकडे जाणारा मार्ग असाच याचा उल्लेख होतो. रस्ता क्र. 8 : गरवारे मार्ग सिडको बसस्टँड ते जळगाव टी-पॉइंट या राज्य महामार्गाला ज्येष्ठ उद्योजक आबासाहेब गरवारे यांचे नाव देण्यात आले आहे. या रस्त्यावरच गरवारे पॉलिस्टरचा प्लँट आहे. प्रत्यक्षात अजूनही जळगाव रोडच म्हणतात. रस्ता क्र. 9 : अशोकजी परांजपे मार्ग : उस्मानपुऱ्यातील संत एकनाथ रंगमंदिर ते गुरुतेगबहादूर शाळेपर्यंतच्या मधल्या रस्त्याला ज्येष्ठ कवी आणि गीतकार अशोक परांजपे असे नाव आहे. पण त्याचा वापर होत नाही. रस्ता क्र. 10 : मेहमूद यार खान रोड : मिल कॉर्नर ते घाटी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे हे नाव कोणालाच माहिती नाही. याची पाटी अजून मिल कॉर्नरच्या चौकात आहे. रस्ता क्र. 11 : नाथ मार्ग महानुभाव पंथाच्या आश्रममार्गे पैठणकडे जाणाऱ्या रस्त्याला नाथ मार्ग असे नाव आहे. पण हादेखील पैठण रोड असाच ओळखला जातो. रस्ता क्र. 12 : विजयेंद्र काबरा मार्ग : अंजली टॉकीज ते महात्मा फुले यांच्या पुतळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विजयेंद्रजी ऊर्फ भाऊसाहेब काबरा मार्ग असे नाव आहे. प्रत्यक्षात तो झेडपी रोड, अंजली टॉकीज किंवा औरंगपुरा रोड असा प्रचलित आहे. रस्ता क्र. 13 : सोपान ढाकरगे मार्ग : बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज ते मिलिंद महाविद्यालय चौकाच्या रस्त्याला विद्यार्थी नेते अ‍ॅड. सोपान ढाकरगे मार्ग नावाची पाटीही आहे. साहेब एक, रस्ते अनेक : बायपास रोडवरील संग्रामनगर चौक ते राधा मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मार्ग तर या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक हे नाव आहे. पालिकेने या नावाची पाटीही बसवली. भवानी पेट्रोल पंप ते प्रोझोन मॉलकडे जाणाऱ्या रस्त्यालाही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आहे. क्रांती चौक ते स्टेशन रस्त्यालाही बाळासाहेब ठाकरेंचे नाव आहे.

रस्ता क्र. 1 : छत्रपती शिवाजी महाराज मार्ग जालना रोडचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज महामार्ग. २००९ पर्यंत याची पाटी क्रांती चौकात होती. पुढे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले व ही पाटी काढून टाकण्यात आली. या रस्त्याची ओळख आजही जालना रोड अशीच. रस्ता क्र. 2 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड मिल कॉर्नर ते बस स्टँडपर्यंतच्या रस्त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग नाव महापालिकेच्या दप्तरी आहे. त्याची प्रत्यक्षात कुठे पाटीच नाही. लोक मात्र त्यास बस स्टँड रोड किंवा मिल कॉर्नर रोड याच नावाने ओळखतात.

रस्ता क्र. 3 : सिकंदर अली वत्झ रोड ज्युबिली पार्क ते पाणचक्की या रस्त्याला विख्यात शायर सिकंदर अली वत्झ यांचे नाव देण्यात आले आहे. या नावाची पाटी केव्हाच गायब झाली. हा रस्ताही घाटी किंवा पाणचक्की रोड नावाने परिचित.

रस्ता क्र. 4 : जे. पी. सईद मार्ग महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरील रस्त्याला माजी केंद्रीय मंत्री जे.पी.सईद यांचे नाव आहे. याची सुस्थितीतील पाटी येथे आहे. पण यासही पालिका रोड, टाऊन हॉल रोड या जुन्या नावानेच ओळखले जाते. रस्ता क्र. 5 : डॉ. राजेंद्रप्रसाद मार्ग जुन्या न्यायालयासमोरील रस्त्याला माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे नाव आहे. त्याचा फलकही येथे आहे. पत्रव्यवहारात याचा उल्लेखही होतो. पण हा रस्ता ओळखला जातो तो अदालत रोड याच नावाने.

एक रस्ता, तीन नावे कोकणवाडी ते रेल्वेस्टेशन रस्त्याला लालबहादूर शास्त्री मार्ग, बाळासाहेब ठाकरे महामार्ग आणि डॉ. पुरुषोत्तम भापकर मार्ग अशी तीन नावे आहेत.

एक पूल, दोन नावे सिडको उड्डाणपुलाला वसंतराव नाईक आणि राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी होती. मात्र या पुलाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव दिले गेले. प्रत्यक्षात पुलावर सावरकर आणि नाईक दोन्ही नावे आहेत. लोक त्याला सिडको बस स्टँड चौक म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...