आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमआयटी महाविद्यालयात ७ महिन्यांच्या गर्भवती असणाऱ्या प्राध्यापिका वर्षा दीपक नागलोत (२८) यांच्या आत्महत्या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. मृत वर्षा यांच्या वडिलांकडून घेतलेले १२ लाख ६० हजार रुपये तिच्या सासू-सासऱ्यांनी मुलगी व जावयाला दिले होते. पुढे याच पैशातून जावई व मुलीने नवीन घर बांधले. तसेच इतरही खरेदी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वर्षाचा छळ करून तिच्या वडिलांकडून उकळलेल्या पैशांतून खरेदी केलेली संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयाशी पत्रव्यवहार व सर्व पुरावे न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली. मृत वर्षा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती दीपक नागलोतसह सासू, सासरा व नणंद या चौघांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी पती दीपकला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित तिघांचा तपास सुरू असल्याची माहिती आडे यांनी दिली.
सर्वांच्या बँक खात्यांची माहिती घेणे सुरू : मृत वर्षा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये एमई करून एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून नोकरी करत होती. त्यापूर्वी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तिने आई-वडिलांची परवानगी घेऊन दीपकसोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतरही दीपकच्या आई-वडिलांनी वर्षाचा छळ करत तिला माहेरहून पैसे आणण्यास भाग पाडले. त्यातूनच तिच्या वडिलांनी १२ लाख ६० हजार रुपये रोख व आॅनलाइन स्वरूपात दिले आहेत. ही रक्कम वर्षाच्या नणंदेच्या खात्यावर आरटीजीएस स्वरूपात तसेच, इतरांच्या खात्यावरही पैसे पाठवल्याबाबतची पोलिस माहिती घेत आहेत. या पैशातून खरेदी केलेली सर्वच मालमत्ता न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. या पैशातून जमीन खरेदी केल्याचीही प्राथमिक माहिती पुढे येत आहे.
मुलाचे घर उद्ध्वस्त करून मुलीचे उभारले ? मुलीला त्रास होऊ नये म्हणून परिस्थिती नसतानादेखील वर्षाच्या वडिलांनी सासरकडील मंडळीला पैसे दिले. पुढे याच पैशातून मुलीने टोलेजंग घर बांधले, तर वर्षाच्या अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकल्याला पोरके केले. तसेच गर्भवती वर्षाही जिवानिशी गेली. एकंदरीतच मुलाचा संसार उद्ध्वस्त करून मुलीचे घर उभारले, अशी संतप्त प्रतिक्रिया समाजमाध्यमातून समोर येत आहे. पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आनंद बनसोड तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.