आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कर्जमाफीचा घोळ:न घेतलेल्या कर्जाचीही सरकारने दिली माफी, प्रमाणपत्रही दिले; जामदयाच्या शेतकऱ्यांवर डोळे पांढरे करण्याची वेळ

हिंगोली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चावडी वाचनामध्ये कर्जमाफीची नावे आल्याने खरा प्रकार समोर आला

सेनगाव तालुक्यातील जामदया येथे न घेतलेल्या कर्जाची शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळाली आहे. चावडी वाचनामध्ये कर्जमाफीची नावे आल्याने खरा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

सेनगाव तालुक्यातील जामदया येथील शेतकऱ्यांना बँक ऑफ इंडिया शाखा सेनगाव येथील बँकेकडून कर्ज देण्यात आले आहे. त्यानंतर शासनाच्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची नावे आली असून शासनाकडून प्राप्त होत असलेल्या ग्रीनलिस्टनुसार कर्जदार व कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे, त्यांनी घेतलेली कर्जे व माफ झाल्याची माहिती चावडी वाचनातून दिली जाऊ लागली आहे.

दरम्यान, गावात दहा दिवसांपूर्वी झालेल्या चावडी वाचनामध्ये ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतले नाही त्यांचीही नावे आली आहेत. एक दोन नव्हे तर वीस पेक्षा अधिक शेतकऱ्यांची नावे यात असल्याने या शेतकऱ्यांच्या नावावर कर्जे घेतल्याचे गौडबंगाल पुढे आले आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. या संदर्भात शेतकरी पंजाब पोले, भिवाजी पोटफाडे, लक्ष्मण होडबे, ज्ञानबा पोटफाडे,अर्जून डाखोरे, आश्रूबा गिरी यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे.

शेती नसतानाही अनेकांना कर्जमाफी

दोन वर्षांपूर्वी बँकेकडे कर्ज मागणीसाठी गेलो होतो. मात्र बँकेने कर्ज देण्यास नकार दिला अन् प्रस्ताव तसाच ठेवून घेतला. कर्ज घेतले नसतानाही कर्जमाफी झाली कशी, असा प्रश्न आहे. काही जणांकडे शेती नसतानाही त्यांना कर्जमाफी झाल्याचे चावडी वाचनामध्ये स्पष्ट झाले आहे. -पंजाब पोले, शेतकरी.