आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • The Guardian Minister's Negligence In Filling The Vacancies In The Education Department Of The Zilla Parishad, Despite The Education Department In Hingoli

हिंगोली:जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील रिक्तपदे भरण्याकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष, शिक्षण खाते असूनही उपयोग होईना

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयातील शिक्षण विभागात रिक्तपदांमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होत असतांनाही रिक्तपदे भरण्याकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे जिल्हयाच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे शिक्षण खाते असूनही त्याचा जिल्ह्यासाठी उपयोग होत नसल्याने शैक्षणिक वर्तुळातून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ८७० प्राथमिक शाळा असून सुमारे २९ माध्यमिक शाळा आहेत. या शिक्षण विभागासह शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. पालकमंत्री प्रा. गायकवाड यांच्या प्रत्येक वेळी हिंगोली दौऱ्यात जिल्हयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्तपदे भरली जातील असे आश्‍वासन दिले जात आहे. मात्र त्याची पुर्तता होत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान, सध्या शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांच्यासह शिक्षण विभागातील इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी शिक्षण विभाग ढवळून निघत आहे. राज्यातील शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता यांच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र अधिव्याख्यात्यांच्या बदल्यांमधे केवळ दोनच जणांची हिंगोलीत नियुक्ती झाली आहे. दरम्यान, हिंगोलीच्या शिक्षण विभागात सध्याच्या स्थितीत उपशिक्षणाधिकाऱ्यांची २ पदे, गटशिक्षणाधिकाऱ्यांची ४ पदे, राजपत्रित मुख्याध्यापकांची १९ पदे रिक्त आहेत. मात्र या बदल्यांमधे हिंगोली जिल्हयातील एकही पद भरले गेले नाही. त्यामुळे जिल्हयाच्या पालकमंत्री प्रा. गायकवाड शिक्षणमंत्री असूनही त्याचा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी फायदा होत नसल्याचे शैक्षणिक वर्तुळातून बोलले जात आहे.

पालकमंत्र्यांच्या त्याच त्या सूचनांना अधिकारीही कंटाळले, बैठकांमधून ठोस निर्णय होईनात

पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ता. १४ झालेल्या बैठकीत त्याच त्या सूचना दिल्या जात असल्याने आता या सूचनांना अधिकारीदेखील कंटाळून गेले आहेत. विशेष म्हणजे एक महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत कर्ज वाटपाबाबत दिलेल्या सूचनांना बँकांच्या अधिकाऱ्यांनी बगल दिल्याने या बैठका होतात कशासाठी असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ता. १४ आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री प्रा.गायकवाड यांनी कोरोना बाबतचा आढावा घेतला. या परिस्थितीत प्रशासनाने योग्य काळजी घेण्याच्या सुचना दिल्या. तसेच पीक कर्ज वाटप याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. तर अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यात पीक नुकसानीचा आढावा घेतला.

दरम्यान मागील एक महिन्यापूर्वी पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये पीक कर्ज वाटपावरून चांगलीच आगपाखड केली होती. बँकांच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन या अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. मात्र बैठक संपल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सूचनांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे पालकमंत्र्यांनी बैठक घेऊनही पीक कर्ज वाटपाची टक्केवारी २९ टक्यावरच अडकून पडली आहे. कोरोनाच्या परिस्थितीत प्रशासनाकडून रुग्णांची काळजी घेतली जात असताना लोकप्रतिनिधी वेगळ्या काय सूचना देणार असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

त्यामुळे कुठलेही ठोस निर्णय न होणाऱ्या बैठका कशासाठी घेतली जातात असा सवालही सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रणच नाही

हिंगोली जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर तसेच पीक कर्ज वाटपाच्या प्रश्नावर बैठकीत चर्चा झाली. मात्र या बैठकीला जिल्ह्यातील आमदार यांना बोलावण्यात आले नसल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे ही बैठक पालकमंत्री केंद्रित बैठक असल्याचाही आरोप केला जाऊ लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...