आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक तटबंदी:साडेतीनशे वर्षे जुन्या ऐतिहासिक तटबंदीवर प्रशासनाचा हातोडा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत असलेली ६५ वर्षे जुनी लेबर कॉलनीतील ३३८ घरे प्रशासनाने दोन दिवसांत जमीनदोस्त केली. मात्र याच भागात रंगीन दरवाजाशेजारी असलेली ३६८ वर्षे जुन्या एोतिहासिक तटबंदीलाही प्रशासनाने जेसीबीने भगदाड पाडले. सुमारे ३ लाख चौरस फूट लांब, दीड फूट रुंद आणि १५ ते २० फूट उंच ही तटबंदी शहरासाठी एोतिहासिक ठेवा होता. त्यावरच प्रशासनाकडून घाला घातला जात असल्याचे कळताच गुरुवारी इतिहासतज्ज्ञ रफत कुरेशी आजारी असतानाही त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी दोन तास उन्हात थांबून पाडापाडीला विरोध केला. सोशल मीडियावर आवाहन करून इतिहासप्रेमींपर्यंतही त्यांनी हा विषय पोहोचवला. त्यामुळे या कारवाईला मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला.

१६ व्या शतकात औरंगजेबाचे अधिकारी औरंगाबादेतील रंगीन दरवाजा परिसरातील कार्यालयात बसायचे, तर या तटबंदीवरून त्यांचे सैनिक गस्त घालत असायचे. तटबंदीतच सैनिकांची हत्यारेही ठेवली जायची. ही संपूर्ण तटबंदी गेल्या काही वर्षांत लेबर कॉलनीतील अतिक्रमणांमुळे दिसेनाशी झाली होती. या ठिकाणी रहिवाशांनी भिंतीचा आधार घेत शौचालये उभारली होती, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ऐतिहासिक शहराच्या खुणा मिटवण्याचे षड‌्यंत्र : यापूर्वी शहरातील खास दरवाजा, खुनी दरवाजा गेला. रणछोडदास हवेली, त्यानंतर दमडी महल या ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त करून टाकल्या. या कामांना आम्ही विरोध केल्याने मला ऐतिहासिक समित्यांवरून हटवण्यात आले. मात्र, आता अधिकाऱ्यांना विरोध करणारे कुणीच उरले नाही. त्यामुळे ते सर्रास इतिहासाच्या पाऊलखुणा मिटवू पाहत आहेत.

एोतिहासिक औरंगाबादची ओळख मिटवण्याचा प्रशासन प्रयत्न करत असताना नागरिक आवाज करत नाहीत, हे दुर्दैव आहे. एेतिहासिक भिंत पाडली जात असल्याची माहिती मिळताक्षणी रफत कुरेशी आणि मी त्याठिकाणी गेलो. दोन तास भर उन्हात थांबून आम्ही पाडापाडी बंद केली. हेरिटेज कमिटीचे इतर सदस्य मदतीला आले. त्यांनी जिल्हाधिकारी आणि प्रशासक दोघांना संपर्क करत काम थांबवले. पण, तोवर अडीच ते तीन फुटांपर्यंतचे बांधकाम पाडण्यात आले होते, असे इतिहासतज्ञ दुल्हारी कुरेशी कळकळीने सांगत होत्या. प्रशासन बेदरकारपणे वास्तू संपवत आहे : ऐतिहासिक वास्तू घोषित झालेल्या १५२ वास्तूंमध्ये या भिंतीचा समावेश आहे. सर्वप्रथम लेबर कॉलनी नष्ट करताना प्रशासनाने त्यालगत असलेल्या ऐतिहासिक वास्तूचे सर्वेक्षण केले होते का? केले असेल तर महापालिका प्रशासनाने हेरिटेज कमिटीकडे रेफर केले होते का? कमिटीने ही तटबंदी नष्ट करण्यासाठी लेखी पत्र दिले होते का? हे जाणून घेणे गरजेचे आहे. कारण, या ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यांना जपणे ही आपली जबाबदारी आहे. महापालिका ज्या बेदरकारपणे ऐतिहासिक वास्तू संपवत आहे, ती गंभीर चिंतेची बाब आहे. लेबर कॉलनीतील घरे पाडण्यापेक्षाही कितीतरी कडवा विरोध या तटबंदीला पाडण्यासाठी झाला पाहिजे, असे इंट्रॅक्टचे मुकुंद भोगले यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीत आघाडी, पण इतिहास संपतोय : इतिहासाच्या खुणा गैरप्रकारे पुसून टाकल्या जात आहेत. विशेष म्हणजे या सर्वांबाबत सामान्य नागरिक अनभिज्ञ आहेत. फाजलपुऱ्याचा पूल गेला, थत्ते नहराचा बळी घेतला, मेहमूद दरवाजा होत्याचा नव्हता केला, किलेअर्क संपवला. आता उरलीसुरली तटबंदी एकदा पाडून टाकण्याचा घाट घातला आहे. आपल्या शहराची ओळख पुसली जात असताना सर्वांनीच पेटून उठले पाहिजे. अन्यथा असे अधिकारी शहराची ओळखच बदलून मोकळे होतील. औरंगाबादची ओळख स्मार्ट शहर म्हणून व्हावी यात काही गैर नाही. पण, ऐतिहासिक ओळख मिटवून स्मार्ट सिटी बनवणे योग्य नाही. स्मार्ट ऐतिहासिक शहर ही ओळख चालू शकते, अशी प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

हृदय कापून ठेवण्याचे काम प्रशासनाने केले : रंगीन दरवाजा, नौबत दरवाजा, फाजलपुरा हा संपूर्ण परिसर ऐतिहासिक शहराची ओळख आहे. त्या काळातील कोर्टाचा हा परिसर आहे. ३५ वर्षांपासून लेबर कॉलनी पाडण्याचा पाठपुरावा सुरू होता तेव्हा प्रशासनाने या परिसराचे काय सर्वेक्षण केले. इतक्या वर्षांत या तटबंदीचा मुद्दा कधीच पुढे येऊ नये ही बाब चिंतेची आहे. एखाद्या रुग्णाची बायपास शस्त्रक्रिया करून त्याला तसेच सोडून देण्याचा प्रकार सध्याचे प्रशासन करत आहे. हा एकट्या लेबर कॉलनीवरील आघात नसून आपल्या सर्वांवरील जबर आघात आहे. तटबंदीही काढून टाकली तर आपण शहरात येणाऱ्यांना काय दाखवणार आहोत, असा सवाल इंटॅक्टचे माजी अध्यक्ष आर्किटेक्ट अजय कुलकर्णी यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...