आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराखी पौर्णिमेनिमित्त बाजारात अगदी दहा रुपयांपासून ते ३५० रुपयांच्या सुंदर राख्या अाल्या अाहेत. नव्याने अालेल्या डायमंड, लटकन आणि स्टोनच्या राख्या लक्ष वेधून घेत आहेत. लाडक्या भावाच्या हातावर शोभून दिसतील अशा राख्यांची खरेदी बहिणी करत आहेत.शहरातील औरंगपुरा, गुलमंडी, ज्योतीनगर, गजानन मंदिर परिसर, सिडको- हडको, टीव्ही सेंटर आणि इतर भागात राख्यांची दुकाने लावण्यात आलेली आहेत. मागील दोन वर्षे कोरोनाच्या सावटामुळे सण-उत्सव साधेपणाने साजरे झाले. यंदा मात्र निर्बंध नसल्याने उत्साहाचे वातावरण आहे.
या वर्षी बाजारात नव्या आकर्षक राख्या आल्या आहेत. त्यामध्ये उशीसारखी दिसणाऱ्या पॅकिंगची राखी, चमकदार स्टोनची राखी, इमोजी राखी, मॅजिक राखी, झुंबर राखी, फळांसारखी दिसणारी राखी, डायमंड राखीलासुद्धा विशेष मागणी आहे. त्यासोबतच मोती, गोंडे लावून तयार केलेली लटकन राखी लक्ष वेधून घेत अाहे. हाय ब्रो, इमेजिंग ब्रो, किंग ब्रो, हॅलो ब्रो, मेरा ब्रो अशा आगळ्यावेगळ्या शब्दांत राख्या बघायला मिळत आहेत. या वर्षी सहजतेने पोस्टाने पाठवता येतील अशा बॉक्स पॅकिंगच्या राख्यांना माेठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गुजरात, सुरतमधील राख्यांची चलती
रक्षाबंधनसाठी खासकरून गुजरात, सुरत, अहमदाबाद येथून राख्या मागवल्या जातात. या राख्या नाजूक, आकर्षक आणि वेगळ्या डिझाइनच्या असल्याने ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. अवघ्या १० रुपयांपासून ते ३५० रुपयांपर्यंत त्यांची विक्री होत आहे.
यंदा किमती वाढल्या
यंदा राख्यांच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. टॅक्स, पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव याचा परिणाम झाला आहे. डायमंड, लटकनसारख्या राख्यांना जास्त मागणी आहे.
- कृष्णा चौधरी, विक्रेता
स्वस्तिक, मोत्याच्या राख्या
गुजरात, सुरत, अहमदाबाद येथील राख्यांना चांगली मागणी आहे. आमच्याकडे १० ते २०० रुपयांपर्यंत राखी उपलब्ध आहे. यात रुद्राक्ष, स्वस्तिक, मोती, ब्रासलेटसारख्या राख्यांना विशेष पसंती मिळतेय.
- प्रिया डुघरेकर, विक्रेता
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.