आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची आहे. ग्रामीण भाग जिल्हा प्रशासनाकडे येतो. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले की यंत्रणा जागी होते. उपचार व उपाययोजनांवर भर दिला जातो. तोपर्यंत तुमच्याकडे कुणी ढुंकूनही बघत नाही. शहरात दररोज २५ हजार कुटुंबे आरओ प्लँटकडून पाण्याचे जार विकत घेतात. या पाण्याची शुद्धता तपासणी, आरओ प्लँटच्या नोंदी ठेवण्याची यंत्रणा कार्यान्वित नाही.
शहर व औद्योगिक वसाहतीतील हजारो नागरिक आरओ प्लँटकडून पिण्याच्या पाण्याचे जार खरेदी करतात. जारमध्ये बोअरवेल व विहिरीचे पाणी भरलेले असते. यात अनेकदा कचरा, किडे सापडतात. जार नियमितपणे स्वच्छ केलेले नसतात. त्यामुळे पाणी दूषित होते. नागरिकांचे आरोग्य बिघडते. पण याबाबत तक्रार कुठे करावी? याची माहिती नागरिकांना नाही. तशी स्वतंत्र यंत्रणा मनपा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे नागरिक दूषित पाण्याबाबत तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.
विश्वासावरच पाण्याची खरेदी : शहरात शुद्ध पिण्याचे पाणी अशी अनेक दुकाने थाटलेले आहेत. येथून नागरिक सकाळी ते रात्री दहा वाजेपर्यंत जारचे पाणी विश्वासाने विकत घेतात. त्याची अधिकृत पावती मिळत नाही व दिलीही जात नाही. दूषित पाण्याची समस्या निर्माण झाली तर तक्रार करण्यासाठी जवळ काहीच नसते.
जीएसटीपण लागत नाही : दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांचे पाण्याचे जार विक्री होतात. मात्र, आरओ प्लँटवाल्यांना जीएसटी भरावा लागत नाही. पॅक्ड वस्तू, पाणी आदींवरच जीएसटी आकारला जातो. त्याची शुद्धता, गुणवत्ता, पोषकतेची हमी दिली जाते. तसे खुल्या पाणी विक्रेत्यांबाबत होत नाही.
जबाबदारी आरोग्य विभागाचीच : दूषित पाणीपुरवठा का होतो? हे शोधण्याचे काम मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे आहे. जार प्लँटला परवानगी देणे, त्यांच्या पाण्याची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे, असे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
एफडीकडे स्वतःच्या प्रयोगशाळेचा अभाव
दूषित, भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे अन्न व औषधींची गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे स्वत:ची प्रयोगशाळाच नाही. त्यामुळे शुद्ध, अशुद्ध पाणी तपासण्याचा प्रश्नच येत नाही. छावणीत आरोग्य विभागाची एक प्रयोगशाळा आहे. कृषी विभाग, काही महाविद्यालयांकडे प्रयोगशाळा आहेत. येथून पिण्याचे पाणी तपासून देण्याची सोय आहे. तर मनपाच्या २४ तास साथरोग नियंत्रण कक्षाच्या २४०२३३३५३६ या क्रमांकावर नागरिकांना तक्रार करता येते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.