आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:औरंगाबादेत उद्योगाच्या अफाट क्षमता, आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जाणे गरजेचे : बी. जे. अरुण; सीएमआयए कार्यालयात उद्योजकांसह साधला संवाद, नव्या क्षितिजाकडे वेधले लक्ष

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाय ग्लोबलच्या माध्यमातून जगभरातील उद्योजक, नवउद्योजक जोडले गेले आहेत. जगातील १२ देशांत ६१ चाप्टर्सच्या माध्यमातून टाय कार्यरत आहे. १९९२ ला सिलिकॉन व्हॅलीतील यशस्वी उद्योजकांनी उद्योगाची चळवळ म्हणून टायची स्थापना केली.

भारतासोबतच इस्रायल आणि जगभरातील अनेक देशांतील स्टार्टअप्सची पायाभरणी टायने केली आहे. अनेक देशांतील स्टार्ट धोरण आखण्यात टायचा वाटा आहे. मात्र, जागतिक पातळी आणि मोठ्या शहरांपर्यंत मर्यादित न राहता औरंगाबादसारख्या छोट्या पण अफाट क्षमता असलेल्या शहरांना जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्ही टायशी संलग्न होण्यासाठी पुढे या, असे आवाहन टाय ग्लोबलचे संचालक बी. जे. अरुण यांनी केले.

मराठवाडा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या बजाज भवन येथे २५ एप्रिल रोजी आयोजित उद्योजकांसह गप्पांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सीएमआयए अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, मॅजिकचे संचालक आणि सीएमआयएचे माजी संचालक आशिष गर्दे, जालना येथील सुनील रायठठ्ठा, रोहित मिश्रा, केदार देशपांडे, मिलिंद कंक उपस्थित होते.

मिलिंद कंक म्हणाले, तरुणांच्या कल्पनांपासून उत्पादन निर्मितीपर्यंत मॅजिकच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो. दोन वर्षांपर्यंत आम्ही त्या नवउद्योजकाला सांभाळतो. असे मॉडेल इतरत्र कुठेही सापडणार नाही. अध्यक्ष जाजू म्हणाले, विविध उद्योगांचे क्लस्टर विकसित करण्याचे काम आम्ही सीएमआयएच्या माध्यमातून करतो. यामुळे अनेक उद्योजकांना मोठा आधार मिळतो. मराठवाडा ऑटो क्लस्टर याचे उत्तम उदाहरण आहे. रायठठ्ठा म्हणाले, आम्ही आमच्या पुढच्या पिढीला काय देणार आहोत, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मागील ३०-४० वर्षांच्या कालखंडात आम्ही अनेक संघर्षांचा सामना करत उद्योग उभे केले आहेत. आमच्या पुढच्या पिढीला याच संघर्षाचा सामना करण्याची वेळ येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...