आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शैक्षणिक:कोरोनाच्या संकटानंतर नर्सिंगकडे वाढतोय विद्यार्थीनींचा ओढा; महाराष्ट्रामध्ये ‘ए.एन.एम’चे 450 नर्सिंग स्कुल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारणारे क्षेत्र असून या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. रूग्णांच्या आयुष्यात त्यांना बरं होण्याच्या प्रक्रियेत महत्वाची घटक नर्स असते. कोरोनाच्या संकटानंतर नर्सेसच्या मागणीत वाढ झाल्याने 'ए.एन.एम' या नर्सिंग अभ्यासक्रमाकडे विद्यार्थीनींचा ओढा वाढत आहे. आकर्षक वेतन आणि पूरक सोयीसुविधा उपलब्ध होत असल्याने या क्षेत्रात करिअर करणे हा यशाचा मार्ग ठरू शकतो, असे शिक्षणतज्ज्ञ मत व्यक्त करत आहेत.

मानव सेवा ही भूमिका घेऊन करिअर करू इच्छित असणाऱ्यांसाठी परिचारिका (नर्सिंग) हा उत्तम पर्याय होऊ शकतो. सामाजिक आरोग्य सेवा पुरवणे, माता-बाल सेवा पुरवणे तसेच नर्सिंग संबंधीचे प्रशासन तसेच व्यवस्थापन विषयक कामे पाहणे, रुग्ण व नातेवाईकांना आरोग्य सल्ला देणे अशी कामे नर्सेस करतात. सद्यःस्थितीत जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना संकटाला रोखण्यासाठी जगभर युध्द पातळीवर प्रयत्न केले जात आहे. या संकटाचा सामना करून ‘आरोग्य सेवा’ हेच जग वाचवू शकते हे स्पष्ट झाल्याने लोक आरोग्य सेवेकडे देवासारखे पाहू लागलेत. संकटातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर, नर्सिंग सेवेतील कर्मचारी स्वत:च्या जीवाची काळजी न करता प्रत्येकाचे जीव वाचवत आहेत. कोरोनाच्या संकटानंतर आरोग्य सेवेत नर्सेसची मागणी वाढल्याने यंदा नर्सिंगच्या 'ए.एन.एम' अभ्यासक्रमाकडे विद्यार्थिनींचा ओढा वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये ‘ए.एन.एम’चे 450 नर्सिंग स्कुल, कॉलेज असून प्रत्येक कॉलेजमध्ये 20 विद्यार्थी संख्येप्रमाणे वर्षाला 9 हजार विद्यार्थी ‘ए.एन.एम’चे शिक्षण पूर्ण करत असल्याचे महाराष्ट्र राज्य खासगी नर्सिंग स्कूल अ‍ॅण्ड मॅनेजमेंट असोसिएशन सचिव शंकर आडसूळ यांनी सांगितले.

आरोग्य संस्थेत ‘ए.एन.एम’ची गरज

‘ए.एन.एम’ नर्स ही शासकीय आरोग्य सेवेचा शेवटचा घटक आहे. आरोग्य सेवा बळकट करताना ग्रामीण, शहरी आरोग्याच्या बाबतीत सक्षम बनवायचे असल्यास असंख्य ‘ए.एन.एम’ची आरोग्य संस्थेत गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) सेंटरमध्ये साधारण 5 ते 7 ‘ए.एन.एम’ नर्स कार्यरत आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार 27 ‘ए.एन.एम’नर्सची प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार 500 व्यक्ती मागे 1 ‘ए.एन.एम’ नर्सची गरज आहे. 1500 यानुसार आपल्याकडे 2000 रुग्णांमागे एकही ‘ए.एन.एम’ नर्स नाही. भविष्यातील गरजेचा विचार केल्यास या क्षेत्रात करिअर करण्याची संधी असल्याचे संस्थाचालक विनोद गायकवाड यांनी सांगितले.