आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:जीप होती वेगात; एकदम ब्रेक दाबले असते तर ट्रॅव्हल्समध्ये मृतांचा खच पडला असता

जालना2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रॅव्हल्स चालकाने सांगितली आपबीती; ट्रॅव्हल्स व जीपच्या अपघातात महिला ठार, 8 जखमी

सकाळच्या सुमारास डुलकी लागू नये म्हणून सतर्क राहतच असतो. रविवारी सकाळीही मुंबईकडून यवतमाळकडे २८ प्रवासी घेऊन जात होतो. दरम्यान, अंबड चौफुली येथे आलो असता, एक-दोन सेकंदांत अंबड रोडकडून भरधाव क्रुझर जीप येताना दिसली. ती येऊन धडकल्याने हृदयाचा एकदम ठोका वाढला. परंतु, याच क्षणी एकदम ब्रेक दाबले असते तर ट्रॅव्हल्समध्येच मृतांचा खच पडला असता. जीपमधील एक महिलेचा झालेला मृत्यू व त्यांची लहान मुले व इतर जखमींना पाहून आम्ही खिन्न झालो, अशी प्रतिक्रिया ट्रॅव्हल्स चालक सुधाकर चव्हाण यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चांदस येथील ९ प्रवासी क्रुझर जीपने जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना येथे लग्नासाठी जात होते. दरम्यान, रविवारी सकाळी ५.३० वाजता ट्रॅव्हल्स व जीपमध्ये झालेल्या अपघातानंतर दुसऱ्या वाहनांचे नागरिक या ठिकाणी थांबले. यानंतर कदीम पोलिसांनी येऊन वाहने बाजूला घेऊन जखमींना तत्काळ एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. हा अपघात एवढा भीषण होता की जीप रस्त्याच्या कडेला तीन वेळा पलटी खात कोसळली. तसेच, खासगी बसचा समोरचा भाग पूर्ण चेंदामेंदा झाला. सुदैवाने ट्रॅव्हल्समधील एकही प्रवासी जखमी झालेला नाही. घटनास्थळी कदीम जालना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक टाक यांच्यासह पोलिस कर्मचारी दीपक दाभाडे, राजू साळवे, उमेश साबळे, गजानन काकडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.

हे आहेत मृत व जखमी
मृत स्वाती अजय काळे (३०), तर जखमींमध्ये धोंडिराम रामराव तांबवे (४२), सागर अरविंद शेंडगे (२७), आनंद उत्तम काळे (२१), प्रियंका सागर शेंडगे (२२), सविता धोंडीराम तांबवे (३५), सार्थक अजय काळे (८), राजवीर सागर शेंडगे (५), राजनंदिनी सागर शेंडगे (३) ही नावे आहेत.

बराच प्रवास झाल्याने झोपेत होतो, काही कळालेच नाही
लग्नासाठी निघाल्यानंतर बराच प्रवास झाला. यामुळे रस्त्याने कधी झोप लागली हे कळालेच नाही. परंतु, जालन्यात आल्यानंतर अचानक गाडीच्या बाहेर पडल्यानंतर अपघात झाल्याचे लक्षात आले. मेहुण्याच्या लग्नासाठी साखर कारखान्याकडे निघालो होतो. धोंडिराम तांबवे, जखमी प्रवासी, सोलापूर.

ट्रॅव्हल्स चालकाला पोलिस आज कोर्टात हजर करणार
अपघातानंतर मृत स्वाती काळे यांचे पती अजय काळे यांच्या फिर्यादीवरून कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ट्रॅव्हल्स चालक सुधाकर चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान, सोमवारी त्या चालकाला कोर्टात हजर केले जाणार आहे.

अपघाताचे कारण पुढे आणणार
अपघात कुणाच्या चुकीमुळे झाला हे समोर आणणार आहे. ट्रॅव्हल्स चालकाला सोमवारी कोर्टात हजर केले जाणार आहे. अपघातातील लहान मुलांसह दोन महिला गंभीर आहेत. मृत महिलेचे पोस्टमाॅर्टेम झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. - दीपक दाभाडे, तपासिक अंमलदार, कदीम ठाणे