आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहोळी, धूलिवंदन अन् रंगपंचमी... निसर्गातील ऋतुबदल समजून घेत, मनातील उत्साहाला सकारात्मकता देणारा सदाबहार उत्सव! देशभरात तो अनेक पद्धतींनी साजरा होतो. उदासीनता दूर सारत प्रियजनांसह निखळ आनंद साजरा करणे, हाच अशा उत्सवांचा मुख्य उद्देश असतो. आणि रंगोत्सवातून तर तो मनाच्या अनेक छटा उलगडत साध्य होतो!
भ गवद्गीतेमध्ये एक सुंदर श्लोक आहे... बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम। मासानां मार्गशीर्षोSहमृतूनां कुसुमाकर।। भगवान श्रीकृष्ण स्वत:च्या असण्याविषयी सांगतात, की वेदांपैकी सामवेदातील बृह्त्साम अध्याय, छंदांमधील गायत्री छंद, महिन्यांमधील मार्गशीर्ष आणि ऋतूंमधील वसंत ऋतू या सगळ्या आपल्या अस्तित्वखुणा आहेत. निसर्ग आणि ईश्वर यांच्यातील अन्योन्य संबंध वेळोवेळी साजरा करणारी भारतीय संस्कृती विस्मयकारी आहे. या संस्कृतीचे सण-उत्सवांशी अतूट नाते आहे. आपला समाज मुळातच उत्सवप्रिय आहे. परंपरेनुसार साजरे होणारे सगळे सण-उत्सव हे निसर्गचक्राशी जोडलेले आहेत. दक्षिणेकडील काही राज्ये वगळता बहुतांश भारतात उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे होलिकोत्सव अर्थात होळी! आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की उत्तरेकडील राज्यांत होळीच्या निमित्ताने रंगोत्सव साजरा केला जातो. श्रीकृष्ण चरित्रातील प्रमुख स्थानांवर- मथुरा, वृंदावन, बरसाने यांसह अनेक ठिकाणी मोठ्या जल्लोषात रंग खेळला जातो. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या गायनशैलीत एक सुंदर प्रकार आहे- होरी. ऋतुराज वसंताच्या स्वागतासाठी साजरा होणारा रंगोत्सव, म्हणजेच मदनोत्सव होय. मनातील कोमल भावनांना व्यक्त रूप देण्याचा काळ म्हणजेच हा रंगोत्सव. राधा-कृष्ण-गोपिका यांच्या रंगक्रीडेची मोहक वर्णने या ‘होरी’तून व्यक्त होतात. खास एखाद्या उत्सवाचे वर्णन करणाऱ्या गीतगायनासाठी स्वतंत्र शैली निर्माण करणे, हेच किती सृजनशील आहे! होरी या शास्त्रीय गायनप्रकारासह ‘फाग’ नावाचे लोकसंगीत बिहारच्या ग्रामीण भागात या उत्सवादरम्यान गायले जाते. प्रत्यक्ष होळीच्या आठवडाभर आधी आकाशदर्शन करून ‘फाग’ लग गया, अशी सूचना केली जाते. जोगिंदर नावाच्या एका कलंदराने ही गाणी कधीकाळी रचली होती आणि ती कित्येक शतकांपासून मौखिक परंपरेतून पुढे येत आहेत. रचियत्याला श्रेय म्हणून या गीतांमध्ये ‘जोगिरा’ असा उल्लेख असतो. बिहार आणि उत्तर प्रदेशात साजरा होणारा रंगोत्सव हा फार मोठी आर्थिक उलाढाल असलेला उत्सव आहे. दिवाळीइतकाच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्त्व असलेला हा सण तिथे साधारण आठवडाभर साजरा होतो. महाराष्ट्रात साजरी होते तशीच होळी आणि धुळवड तिथेही असते. अगदी शेणाच्या गोवऱ्या रचून, रीतसर पूजा करून होळी पेटवली जाते. गोवऱ्यांच्या मध्यभागी असलेल्या मंडलात एक मडके ठेवलेले असते. त्यात कोवळ्या हरभऱ्याच्या जुड्या भाजण्यासाठी ठेवल्या जातात. त्याला ‘झंगरी’ असे नाव आहे. होळीच्या ज्वाळा ज्या दिशेने जातील, त्यानुसार येणाऱ्या नक्षत्रांत पाऊसपाणी कसे असेल, याचा अंदाज जुनीजाणती मंडळी बांधतात. दुसऱ्या दिवशी सकाळी राख थंड झाल्यावर मडके बाहेर काढून त्यातील हरभरा प्रसाद म्हणून वाटला जातो. राखेत पाणी घालून धुळवड खेळली जाते. इथे संपते ‘छोटी होली’. संध्याकाळी ‘बडी होली’ असते. साजशृंगार करून, नवे कपडे घालून घरातील थोरामोठ्यांना नमस्कार करून, त्यांच्या पावलांना रंग लावण्याचा रिवाज आहे. मोठी माणसे मग रंग लावणाऱ्या सगळ्यांना आशीर्वाद म्हणून सुका मेवा, पैसे असा शगुन देतात. मालपुआ, दहीवडे, गुजिया, नमकीन, ठंडाई अशी मिठायांची रेलचेल असते. त्यानंतर घराघरांतील तरुण मंडळींचा रंगोत्सव सुरू होतो. बरीचशी छेडछाड, चेष्टामस्करी असे याचे स्वरूप असते. राधिकेचे माहेर समजल्या जाणाऱ्या बरसाने या गावात तर ‘लठमार’ होली खेळली जाते. गोप-गोपिकांमधील लटक्या झगड्याबरोबरच दिराने आपली यथेच्छ चेष्टा केल्यामुळे रागावलेली नवपरिणीत भाभी त्याला लाठीचा मार देऊन बदला घेते, असाही त्याचा अर्थ मानला जातो. मथुरेत तर रंगांऐवजी फुलांनी होळी खेळली जाते. उत्तरेकडील राज्यांप्रमाणे गुजरातमध्येही होळी साजरी केली जाते. पारंपरिक होलिकापूजन आणि दहन केले जाते. सरपणाची लाकडे, गोवऱ्यांची रास करून होळी रचली जाते. मध्यभागी असलेल्या मंडलात एक मडके ठेवलेले असते. त्यात कोवळ्या गव्हाच्या लोंब्या, नारळाचे तुकडे असे भरून मडक्याचे तोंड लिंपून ठेवले जाते. होळी थंड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मडक्यातील गहू-नारळाचा प्रसाद सगळ्यांना दिला जातो. राखेत पाणी मिसळून धुळवड मोठ्या उत्साहात खेळली जाते. या प्रांतात रंग मात्र पारंपरिक पद्धतीनेच खेळला जातो. केसूडो नावाच्या झाडाच्या फुला-पानांपासून रंग तयार करून तो खेळला जातो. द्वारकेत, सौराष्ट्रात श्रीनाथजींची पूजा करून रंग अर्पण केला जातो. सर्वात वैशिष्ट्यपूर्ण वाटतो, तो पश्चिम बंगालमधल्या ‘शांतिनिकेतना’मध्ये साजरा होणारा वसंतोत्सव! गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनात या रंगोत्सवची सुरुवात केली. जगभरातून येणारे पर्यटक इथल्या विद्यार्थ्यांसह या उत्सवात सहभागी होतात. वसंतोत्सवाची तयारी म्हणून संपूर्ण शांतिनिकेतन उत्फुल्ल रंगांमध्ये रंगून जाते. सर्व रंगांमध्ये सुरेख अशा पिवळ्या रंगाला मानाचे स्थान असते. सगळे विद्यार्थीही पिवळ्या रंगाच्या छटांचे वेश परिधान करतात. विद्यार्थी गायन, वादन, नृत्य, चित्रकारी अशा कलांचे प्रदर्शन करतात. शिक्षक-प्राध्यापकांना एकत्र आणून अबीर-गुलालाचे टिळे लावतात. एकुणातच, होळी, धूलिवंदन अन् रंगपंचमी... निसर्गात होणारा ऋतुबदल समजून घेत, मनातील उत्साहाला सकारात्मक दिशा देणारा हा सदाबहार उत्सव आहे. त्या निमित्ताने वातावरणात मांगल्याचे, आनंदाचे सूर दरवळतात. महाराष्ट्रासह देशभरात तो पारंपरिक नि आधुनिक अशा कितीतरी रंगछटांमध्ये साजरा होतो. काही ना काही कारणांमुळे येणारी उदासीनता दूर सारत प्रियजनांसह निखळ आनंद साजरा करणे, हाच आपल्या अशा उत्सवांचा मुख्य उद्देश असतो. रंगोत्सवातून तर तो मानवी मनाच्या कितीतरी छटा उलगडत साध्य होतो!
प्राची कुलकर्णी-गरुड prachihere@gmail.com संपर्क : 9822493880
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.