आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:निकाल पाहताच सरकळीचे खंदारे कुटुंबिय ओक्साबोक्सी रडले,  भावाचा मृतदेह घरात ठेऊन परिक्षा दिलेल्या रियाने मिळविले 81.20 टक्के

हिंगोली11 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

आज सकाळ पासूनच सरकळी (ता.हिंगोली) येथील अनिल खंदारे यांच्या घरात धिरगंभीर वातावरण होते, मुलगी रिया अनिल खंदारे हिचा दहावीचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते, दुपारी एक वाजता निकाल जाहिर होताच संपूर्ण कुटुंबच ओक्साबोक्सी रडले. लहान भावाचा मृतदेह घरात ठेऊन परिक्षा दिलेल्या रियाने विज्ञान विषयात 79 गुण मिळविलेच तर एकूण 81.20 टक्के गुण मिळविले आहे.

हिंगोली तालुक्यातील सरकळी येथील रिया अनिल खंदारे हि विद्यार्थीनी हिंगोलीच्या आदर्श विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये होती तर तिचा एकुलता एक लहान भाऊ गौरव खंदारे आठव्या वर्गात शिक्षण घेत होता. अनिल खंदारे यांनी गॅस एजन्सीवर काम करून प्रतिकुल परिस्थिती असतांना दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. रिया अन गौरव यांच्यात अभ्यासात तिव्र स्पर्धा होत होती.

दरम्यान, ता. 10 मार्च पासूनच गौरव यास ताप येऊ लागली. त्याला उपचारासाठी हिंगोली येथून नांदेडला हलविले. मात्र तेथे उपचार सुरु असतांनाच गौरवचा ता. १६ मार्च रोजी पहाटे मृत्यू झाला. तर याच दिवशी रियाचा विज्ञान विषयाचा पेपर होता. घरात लहान भाऊ गौरव याचा मृतदेह असतांनाही मोठे दुःख बाजुला ठेऊन वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी रियाने विज्ञान विषयाचा पेपरही दिला. त्यानंतर दुपारी भावाच्या अंत्यसंस्कारासाठी ती उपस्थित राहिली.

दरम्यान, आज दहावीचा निकाल असल्याने खंदारे कुटुंबियांकडे गंभीर वातावरण होते. दुपारी एक वाजता निकाल हाती आला अन संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले. एकीकडे लहान भाऊ गेला तर दुसरीकडे 81.20 टक्के गुण मिळविले. यामध्ये नेमके आनंद व्यक्त करावा का आई, वडिलांना सावरायचे हेच रियाला कळेनासे झाले. या प्रसंगातही तिने भावाच्या छायाचित्रासमोर निकालाचा कागद ठेवताच सर्व कुटुंबच ओक्साबोक्सी रडले. त्यांना धिर देण्यासाठी शेजारीही आले. मात्र घरातील प्रसंग पाहून शेजाऱ्यांच्या डोळ्यातही आश्रू आले. आता पुढे वैद्यकिय अभ्यासक्रम पूर्ण करणयाची इच्छा असल्याचे रिया खंदारे हिने सांगितले.

गौरवची जिद्द रियाला बळ देणार ः अनिल खंदारे
गौरव अन रिया यांच्यात अभ्यासात नेहमीच स्पर्धा होत होती. इयत्ता दहावी परिक्षेत तुझ्या पेक्षा जास्त गुण मिळवून दाखवतो असे इयत्ता आठवी वर्गात शिक्षण घेत असलेला गौरव बोलून दाखवत होता. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. मात्र आता गौरवची जिद्दच रियाला अभ्यासासाठी बळ देणारी ठरेल. पोटाला चिमटा घेऊन रियाला तिच्या आवडीच्या क्षेत्रात करीयर करण्याची संधी दिली जाईल.

0