आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:मारेकरी पती म्हणतो, मोबाइलवरील कॉल सतत एंगेज लागत असल्याने मारून टाकले ; पोलिसांच्या भीतीने रात्री झोपून पहाटे पळायचा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून मच्छिंद्र पिराजी पिट्टेकर (५५) याने पत्नी बिल्कीस ऊर्फ मीना मच्छिंद्र पिट्टेकर (५०) हिची स्वयंपाकघरातील दगडी खलबत्त्याने डोके ठेचून निर्घृण हत्या केली होती. घटनेनंतर मच्छिंद्र नगर जिल्ह्यातील चिलकनवाडीत जाऊन लपला होता. पोलिसांच्या भीतीने रात्री घरी जाऊन झोपत आणि पहाटेच घर सोडून पसार होत होता. त्यामुळे सातारा पोलिसांनी त्याला झोपेत असतानाच ताब्यात घेऊन अटक करत बुधवारी शहरात आणले. पोलिसांनी पत्नीच्या खुनाचे नेमके कारण विचारले असता तिला कॉल केल्यास नेहमी व्यग्र येत होता त्यामुळे संशय आला व मारून टाकले, असे निर्लज्जपणे सांगून खुनाची कबुली दिली. कामाच्या शोधात काही वर्षांपूर्वी शहरात आलेल्या मच्छिंद्रने हॉटेलवर काम करणाऱ्या बिल्कीससोबत प्रेमविवाह केला होता. बिल्कीसच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते. तिला पहिल्या पतीपसून एक मुलगी, तर दुसऱ्यापासून एक मुलगी, एक मुलगा आहे. ते राहुलनगरात राहत होते. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू झाले. त्याने पत्नीवर संशय घेणे सुरू केले. त्यातून ५ जून रोजी मध्यरात्रीतून दगडी खलबत्त्याने डोके ठेचून हत्या केली. त्यानंतर बाहेरून कुलूप लावून पोबारा केला होता. निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी तत्काळ तीन पथके रवाना केली. यात एक पथक चिलकनबाडी येथे पोहोचले. अंमलदार सुनील धुळे, दीपक शिंदे यांना खबऱ्यामार्फत कळाले की, मच्छिंद्र गावातच आला आहे. मात्र, दिवसभर फरार राहून रात्री घरी येतो. त्यामुळे शिंदे व धुळे रात्री अंधारात दबा धरून बसले. मंगळवारी रात्री मच्छिंद्र ११:३० वाजता घरी पोहोचला व त्याला तत्काळ ताब्यात घेतले. त्याने चौकशीत संशयावरून खून केल्याची कबुली दिली. तिचे वागणे बदलले होते. स्वयंपाक करून देत नव्हती. कॉल केल्यास नेहमी व्यग्र येत होता म्हणून मारून टाकले, अशी कबुली त्याने दिली. ही कारवाई माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक देविदास शेवाळे, अंमलदार सुनील धुळे, दीपक शिंदे, सुनील पवार, अजित लोंढे, मंगेश जाधव, अभय भालेराव यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...