आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बौद्ध-जैन आणि हिंदू धर्मीयांच्या देवस्थानांना एकाच वेळी जोडणाऱ्या कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे. औरंगाबाद येथील हिरालाल कासलीवाल यांनी ११ वर्षे पाठपुरावा केल्यानंतर औरंगाबादमार्गे एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. मार्ग कमी करून आता १९ फेब्रुवारीपासून लातूर- परळी-परभणीमार्गे ही रेल्वे धावणार आहे.
भाजपचे लातूर जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गाेयल यांना दिलेल्या निवेदनावरून रेल्वेमार्गात बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आमदार पवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना आमदार पवार त्यांचे खासगी स्वीय सचिव हाेते. दरम्यान, नवीन सुधारित वेळापत्रकानुसार कोल्हापूर-धनबाद रेल्वे आता लातूर- परळी-परभणीमार्गे धावणार आहे. औरंगाबाद व जालनेकरांच्या हक्काची एक रेल्वे इतरत्र पळवल्याने आता येथील भाविकांची मोठी अडचण झाली.
औरंगाबाद व जालना येथील जैन धर्मीयांची संख्या लक्षात घेता येथून कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. जैन धर्मीयांचे पवित्र स्थान असलेल्या शिखर सम्मेदजींचे दर्शन घेता यावे म्हणून प्रत्येक बुधवारी औरंगाबाद-जालनासह परभणी नांदेड आदिलाबाद अशी एक्स्प्रेस चालवली जात होती. या रेल्वेला मोठ्या प्रमाणावर प्रतीक्षा यादीही होती. परंतु लॉकडाऊन मार्च २०२० मध्ये घेण्यात आले तेव्हा सर्व रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता प्रथमच रेल्वे सुरू करण्यात आली असून संबंधित रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला आहे. कोल्हापूर, पुणे, दौंड, नगर मनमाड, औरंगाबाद, जालनामार्गे जाणाऱ्या एक्स्प्रेसला शॉर्टकट देण्यात आला आहे. नव्याने आता ही रेल्वे कोल्हापूरहून निघाल्यानंतर मिरज, पंढरपूर, कुर्डुवाडी, लातूर, परळी, परभणी, नांदेड, आदिलाबाद नागपूर, गया, पारसनाथमार्गे धनबादला जाईल आणि याच मार्गे परतीच्या प्रवासाला निघेल.
मागणी करूनही नवीन रेल्वे मिळेना : औरंगाबादमार्गे फेस्टिव्हल रेल्वे सुरू करण्याची अनेक दिवसांपासून मागणी केली जात असताना नवीन रेल्वे सोडत नसून मात्र आहे ती गाडीही पळवत असल्याची टीका मराठवाडा रेल्वे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी केली आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या फोनला दर्शवला होकार
औरंगाबाद येथील हिरालाल कासलीवाल यांनी जैनांचे पवित्र धार्मिक स्थान असलेल्या झारखंडमधील शिखर सम्मेदजीसाठी औरंगाबाद-जालनामार्गे रेल्वे सुरू करण्यासाठी ११ वर्षे कसोशीने प्रयत्न केले. २००९ मध्ये त्यांना रेल्वे मंत्रालयातून फोन आला. आम्ही नागपूर ते गया बौद्ध सर्किट जोडत आहोत. त्यात हिंदूंचे पवित्र स्थान बनारस येते. बौद्ध आणि हिंदू धर्माची श्रद्धास्थाने असलेली गाडी तुम्हाला चालेल का, असे म्हटल्यानंतर हिरालाल कासलीवाल यांना आनंद झाला व त्यांनी होकार दर्शवला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.