आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासकामांच्या घोषणा:भुमरेंनी मुख्यमंत्र्यांसाठी पाठवलेली चिठ्ठी डॉ. कराडांमार्गे दानवेंकडे जाऊन आली परत

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या विभागीय आढावा बैठकीतील पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या नूतनीकरणाची घोषणा करावी, अशी विनंती करणारी चिठ्ठी आमदार संदिपान भुमरे यांनी शिंदे यांच्याकडे देण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्याकडे दिली. कराडांनी ती शिंदेंच्या बाजूला बसलेल्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे दिली. चिठ्ठीचा आपल्याशी काय संबंध हे लक्षात न आल्याने दानवेंनी परत पाठवली. त्यामुळे भुमरे चांगलेच तगमगले. त्यांनी पुन्हा शिंदे यांच्या दिशेने खुणावून चिठ्ठी पाठवली. ती मात्र दानवेंनी शिंदे यांच्याकडे दिली.

मग त्यांनी संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या नूतनीकरणाची घोषणा केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाविषयी मुख्यमंत्री घोषणा करत असताना डाॅ. कराड यांनी त्यांना चिठ्ठीवर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाची आठवण करून दिली. घाटीतील सुपर स्पेशालिटीचे खासगीकरण रोखण्यासाठी आमदार प्रदीप जैस्वाल, तर औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ व्हावे यासाठी आमदार संजय शिरसाट आग्रही होते. याविषयी शिंदे यांनी घोषणा करताच दोघांचेही चेहरे चांगलेच खुलले. रामदासभाईंची एंट्री चर्चेचा विषय उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडलेले शिवसेना नेते, औरंगाबादचे माजी पालकमंत्री रामदास कदम यांची आढावा बैठकीला उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. या भागाची जाण असलेले माजी पालकमंत्री आणि नेते असा कदम यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि कदम यांच्यात कधीच सामंजस्य नव्हते. त्यानंतरचे पालकमंत्री सुभाष देसाई त्यांच्या एककल्लीपणामुळे संघटनेत प्रिय नव्हते. त्यामुळे शिवसैनिक कायम कदम यांची आठवण काढत. आता रामदासभाईंची औरंगाबादेतील एंट्री उद्धव गटाला आणखीच खिंडार पाडणारी ठरू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केले महापुरुषांना अभिवादन रविवारी सकाळी ११.३० वाजता औरंगाबादचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या दर्शनाने मुख्यमंत्र्यांनी दौऱ्याची सुरुवात केली. राजाबाजार येथील जैन मंदिरात पुलकसागर महाराजांचे दर्शन घेतले. टीव्ही सेंटर येथे छत्रपती संभाजी महाराज, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सिल्लेखाना येथे स्वातंत्र्यवीर सावकर, क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिंदे यांनी अभिवादन केले.

ताफा थांबवून रस्त्यावर स्वीकारली निवेदने मुख्यमंत्री सिल्लोडकडे निघाले होते. तेव्हा विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर अनेक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, सामान्य नागरिक निवेदन घेऊन उभे होते. पोलिस त्यांना अडवत होते. हे पाहताच शिंदे यांनी ताफा थांबवून रस्त्यावरच निवेदने स्वीकारली.

बातम्या आणखी आहेत...