आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:पेरजाबाद येथे लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीवघेणा प्रवास, पूर्णा नदीच्या पात्रातून करावी लागते पायपीट

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील पेरजाबाद येथे लसीकरण करण्यास जाण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे. पुर्णा नदीचे पात्र ओलांडून गावात जावे लागत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. या ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्याच्या गावकऱ्यांच्या मागणीकडे प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होऊ लागले आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पेरजाबाद हे गाव आहे. या गावाचा सुमारे बाराशे लोकवस्तीच्या या गावाचा जवळाबाजार या गावाशी संपर्क येतो. शिक्षण, आरोग्य विषयक सुविधांसह साहित्य खरेदीसाठी या गावातील गावकऱ्यांना जवळाबाजार येेथे जावे लागते. मात्र जवळाबाजार येथे जाण्यासाठी पुर्णा नदीचे पात्र अोलांडून नालेगाव व त्यानंतर तेथून जवळाबाजर येथे जावे लागत आहे. सदरील रस्ता सुमारे आठ ते नऊ किलो मिटर अंतराचा आहे.

या शिवाय पावसाळ्यात नदीला पूर आल्यास गावकऱ्यांना पेरजाबाद येथून नऊ किलो मिटर अंतरावरील पोटा त्यानंतर साळणा ते औंढा नागनाथ मार्गे जवळाबाजार असा चाळीस किलो मिटर अंतराचा फेरा मारावा लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यात या गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. या ठिकाणी पुर्णा नदीवर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

दरम्यान, जवळाबाजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला या गावात लसीकरणासाठी जावे लागते. गरोदर माता, स्तनदा माता यांना मार्गदर्शन तसेच बालकांचे लसीकरण करण्याचे काम करावे लागते. त्यासाठी महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनाही या पाण्यातून जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. सध्या लसीकरणाचे काम सुरु करण्यात आले असून त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना पुर्णा नदीच्या पात्रातून गुडघ्या एवढ्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाची तातडीने मागणी केली जाऊ लागली आहे.

प्रशासनाने लक्ष द्यावे ः चांदोजी म्हात्रे, गावकरी पेरजाबाद

गावकऱ्यांना बाहेरगावी जाण्यासाठी नदीचे पात्र ओलांडावे लागत आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी घ्यावी लागत आहे. तर गंभीर आजारी रुग्णांना उपचारासाठी चाळीस किलोमिटरचा फेरा मारावा लागत आहे. त्यासाठी आता प्रशासनासोबतच शासनानेही लक्ष देणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...