आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण हक्क:आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी यादी जाहीर, पालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 16 जूनपर्यंत मुदत

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) जिल्ह्यातील रिक्‍त 1341 जागांसाठी प्रतीक्षा यादीतील प्रवेशपात्र बालकांच्या पालकांसाठी प्रवेश प्रक्रिया 19 मे पासून सुरू करण्यात आली होती. पालकांना प्रवेशसाठी आतापर्यंत दोनवेळा मुदत देण्यात आली आहे. मात्र, प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, म्हणून शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा प्रतीक्षा यादीतील दुसरी यादी शुक्रवारी जाहीर केली असून, प्रवेशासाठी पालकांना 16 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

आरटीईअंतर्गत जिल्ह्यातील 575 शाळांची नोंदणी झाली आहे. यात 4 हजार 301 प्रवेशाच्या जागा दर्शविल्या आहेत. यासाठी 17 हजार 221 बालकांचे ऑनलाइन अर्ज दाखल झाले. लॉटरीद्वारे 4 हजार 193 बालकांची निवड झाली. यात 2 हजार 709 बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून शाळांमध्ये प्रवेश झाले. त्यानंतर रिक्‍त जागांवरील प्रवेशासाठी 19 मे पासून सुरुवात करण्यात आली होती. प्रतीक्षा यादीतून पहिल्या टप्प्यात 1 हजार 341 बालकांना संधी देण्यात आली. मात्र, दोनवेळा मुदतवाढ देवूनही केवळ 443 बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. अद्याप प्रतीक्षा यादीतील 898 जागा भरणे बाकी आहे. या जागा भरण्यासाठी तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पालकांना 16 जूनपर्यंत प्रवेशासाठी मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती आरटीई प्रवेशाच्या औरंगाबाद जिल्ह्याच्या समन्वयक संगीता सावळे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...