आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजकांत भीती:कंपनीतून मुरूम चोरी थांबवण्यासाठी गेलेल्या मालकाच्या अंगावर माफियांनी घातला ट्रक

वाळूजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज परिसरात भंगार चोरट्यांच्या दहशतीसोबतच आता मुरूम चोरट्यांचीही दहशत वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी स्वत:च्या मालकीच्या भूखंडातून मुरूम चोरी रोखण्यासाठी गेलेल्या मालकाच्या अंगावर मुरूम चोरट्याने चक्क ट्रक घातल्याचा प्रकार समाेर आला. धक्कादायक बाब अशी की, पुढे कारमधून निघून जाणाऱ्या उद्योजकाचा ४ किलोमीटरपर्यंत माफियांनी पाठलाग केला. उल्लेखनीय बाब अशी की, सदरील भूखंड हा एमआयडीसी वाळूज ठाणेंतर्गत असणाऱ्या पोलिस चौकीच्या मागील बाजूस आहे. सदरील घटनेमु‌ळे उद्योजक हादरले असून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्री सायगन इंडस्ट्रीजचे मालक, उद्योजक अजय रमेशचंद्र गांधी (४७, रा. बन्सीलालनगर) यांच्या मालकीचा एम-२०१ येथे मोकळा भूखंड आहे. सदरील जागेवर बांधकाम करायचे असल्याने जागेची पाहणी करण्यासाठी गांधी २ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता गेले असता त्यांना सदर ठिकाणी माफिया जेसीबी व ट्रकच्या मदतीने मुरूम चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी गांधी कारमधून उतरून चोरट्याच्या ट्रकच्या दिशेने निघाले असता ट्रकचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन गांधी यांच्या अंगावर घातले. प्रसंगावधान राखत गांधी यांनी कारमध्ये बसून पळ काढला. मात्र, ट्रकचालकाने कारचा पाठलाग केल्याने घाबरून शहराच्या दिशेने निघून गेल्याचे गांधी यांनी सांगितले.

माफियांनी पुन्हा मुरूम चोरी सुरूच ठेवली सदरील घटनेनंतर त्यांनी ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी महसूलकडे बोट दाखवले. त्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयात घटनेची माहिती दिली. ४ नोव्हेंबर रोजी पहाटे २:३० वाजता ते कंपनीतील सहकाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी गेले असता, पुन्हा दोन ट्रक व एका जेसीबीच्या मदतीने मुरूम चोरी होत असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी ११२ क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुरूम चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. यात ट्रकचालक आकाश बाबासाहेब पिठले, सागर गायकवाड, मालक पप्पू पिठले, जेसीबीचालक लोकेश माळी, जेसीबी मालक कृष्णा काजळेचा समावेश आहे.

विना क्रमांक वाहनांचा वापर, प्रशासनाचे दुर्लक्ष मुरूम चोरट्यांकडून वापरण्यात येणाऱ्या एकाही वाहनावर क्रमांक नसतो, अशा प्रकारची विना क्रमांक वाहने औद्योगिक परिसरात फिरतातच कशी, असा प्रश्न उपस्थित हाेताे. आपल्या जिवाचे काही बरेवाईट झाले असते तर त्याला जबाबदार कोण होते, असा संतप्त सवाल उद्योजक गांधी यांनी उपस्थित केला.

पोलिस चौकीचा काय उपयोग ? घटना घडल्यानंतर स्थानिक पोेलिसांशी संपर्क साधूनही पोलिस गांभीर्याने घेत नाहीत, उलट ११२ क्रमांकावर कॉल करा, मग मदत मिळेल, असा सल्ला देतात. ११२ क्रमांकावरच कॉल करून मदत मिळणार असेल तर स्थानिक पोलिस कशासाठी आहेत, असा प्रश्न उद्योजकांनी उपस्थित केला. सदरील घटना घडली त्याच्या समोरील बाजूला एका नामांकित कंपनीच्या पुढाकारातून तत्कालीन पोलिस आयुक्तांच्या व उद्योगमंत्र्यांच्या पुढाकारातून उभारलेली पोलिस चौकी आज नावापुरतीच असल्याची खंतही उद्योजकांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...