आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:बाजार समितीने मंत्र्यांची नावे वगळली; भाजप पदाधिकाऱ्यांचा सभेवर बहिष्कार

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या वार्षिक अहवालात भाजप आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड यांचे नाव वगळून उर्वरित प्रमुख लोकप्रतिनिधींच्या फोटाेसह नाव, पदांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. भाजपचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राम शेळके यांनी दोन मंत्री व आमदारांचे फोटोसह नावे का घेतले नाही, असा प्रश्न उपस्थित करून जाब विचारला. त्यावर सचिव विजय शिरसाठ यांनी प्रशासक मंडळाच्या निर्देशानुसार मी माझे काम केल्याचे सांगितले, तर मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे यांनी सचिवांनी काय प्रोटोकॉल केला आहे त्याची माहिती दिली नाही. यापुढे असे होणार नाही, असे म्हणून दिलगिरी व्यक्त केली. त्यावर समाधान न झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. महाविकास आघाडी सरकारचे व प्रशासकीय मंडळाच्या कारभाराचा निषेध व्यक्त करून निघून गेले.

सभेची दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली. काळे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर शिरसाठ यांनी अहवाल वाचन, विषयपत्रिका, उत्पन्न व खर्चाचा आढावा, ऐनवेळीच्या प्रश्नांबाबत माहिती देत हाेते. या वेळी ज्या आमदारांनी समितीसाठी काहीच केले नाही त्यांच्या फोटोंना प्रसिद्धी दिली व ज्यांनी समितीच्या विकासासाठी ९.५० कोटींचा कर माफ करून निधी दिला असे आमदार हरिभाऊ बागडे, मंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव का विसारलात, असा प्रश्न शेळके व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित करून सचिवांना धारेवर धरले होते. पण, काळे यांनी मध्यस्थी करत आम्ही नवीन आहोत, नियम-अटी माहिती नाहीत. सचिवांनी आम्हाला अगोदर माहिती द्यायला हवी होती. पण आता सर्व काही झाले आहे. यानंतर अशी चूक होणार नाही, अशी दिलगिरी व्यक्त करून विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

आघाडीकडून भाजप पदाधिकाऱ्यांचा पदोपदी अवमान
महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या ताब्यातील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर आघाडीचे प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांचे स्वागत शेवटी केले, तर काहींचे केलेच नाही. या अहवालातून दोन मंत्री, दोन आमदारांचे नाव वगळण्यात आले. ही आपली संस्कृती नाही. सध्याचे राजकारण खालच्या दर्जाचे सुरू असल्याची परखड टीका शेतकऱ्यांनी केली. नवीन प्रशासकीय मंडळात आडत, व्यापारी, हमालांपैकी काेणाचाही समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या गटातील सर्व अनुपस्थित होते.

नवीन प्रशासकही बहुतांश गैरहजर
वार्षिक सभा महत्त्वपूर्ण असते. मात्र, याचे नवीन प्रशासकांना काहीच देणेघेणे नसल्याचे दिसून आले. बहुतांश प्रशासक अनुपस्थित होते. यात उपाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांचादेखील समावेश हाेता.

ते पळून गेले : सचिव अहवालाचे वाचन करत होते. माजी संचालकाने मध्येच रोखले. सर्व अहवाल वाचन झाल्यानंतर माजी संचालक मंडळाने केलेल्या अवास्तव खर्चाची विचारणा होणार होती. विशेष समिती चौकशीच्या अनुषंगाने प्रश्नांचा भडिमार होणार होता. याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे ते शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडता नेत्याच्या फोटोचा प्रश्न उपस्थित करून पळून गेले. - जगन्नाथ काळे, मुख्य प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, औरंगाबाद.

तीव्र शब्दांत निषेध, काळे कुटुंबीयांसाठी सभा होती
दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या नावे असलेल्या सभागृहात सभा सुरू होत असे. मात्र, यंदा दीप प्रज्वलनाने व आडतमध्ये सभा सुरू झाली. मंत्री रावसाहेब दानवे, आमदार हरिभाऊ बागडे आदी लोकप्रतिनिधींनी बाजार समितीच्या विकासात योगदान दिले त्यांचेच नाव व फोटो अहवालात न घेता मनमानी पद्धतीने माजी आमदारांचे फोटो छापले. राज्यमंत्री सत्तार यांचे नाव ते विसरले होते. यामुळे त्यांना दुसरा अहवाल प्रसिद्ध करावा लागला. घाणेरड्या राजकारणापायी त्यांनी हा सर्व प्रकार केला असून त्याचा आम्ही निषेध व्यक्त करून सभात्याग केला. भारत बंदमुळे शेतकरी गैरहजर होते. त्यामुळे ही सभा काळे कुटुंबीयांसाठी होती. -राधाकिसन पठाडे, माजी सभापती

बातम्या आणखी आहेत...