आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात महाविकास आघाडीने विराट सभा घेत रविवारी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेची वज्रमूठ असल्याचे जाहीर केले. त्याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सोमवारी भाजपकडून गोमूत्र शिंपडण्यात आले. ज्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला संपवण्याचा आदेश दिला, त्याच ठिकाणी त्यांच्या मुलाने त्यांच्यासोबत सभा घेतली. म्हणून हे मैदान आम्ही पवित्र केल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.
बाळासाहेब ठाकरे यांनी सांस्कृतिक मंडळावर अनेक विराट सभा घेतल्या हाेत्या. प्रत्येक सभेतून त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला कडवे आव्हान दिले. जर वेळ आली तर मी माझे दुकान बंद करेन, पण या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत कधीही सत्ता स्थापन करणार नाही, असे ते सांगायचे. परंतु रविवारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दोन कुबड्या घेऊन सभा घ्यावी लागली. ही सगळ्यात मोठी शोकांतिका असल्याची टीका भाजपने केली. या वेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, सुहास दाशरथे, हर्षवर्धन कराड, ॲड. अमित देशपांडे आदींची उपस्थिती होती.
हे कृत्य म्हणजे सावरकरांच्या विचारांवर पाणी : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजाला हिंदुत्ववादी विचार व वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. कर्मकांड व अंधश्रद्धेवर ते नेहमीच टीका करायचे. त्यामुळे स्वतःला त्यांच्या विचाराचे समजणाऱ्या लोकांकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्याची कृती निषेधार्ह आहे. सावरकरांच्या विचारांवर पाणी फेरल्यासारखेच आहे, असे मत उद्धव सेनेचे पूर्व मतदारसंघाचे संघटक रेणुकादास वैद्य यांनी व्यक्त केले.
इम्तियाज जलील मंदिरात गेले, त्या ठिकाणी गोमूत्र का शिंपडले नाहीॽ : ज्या ठिकाणी महाविकास आघाडीची सभा झाली त्या ठिकाणी भारतमातेचे पूजन, राज्यघटनेचे पूजन करण्यात आले. सभेस लाखो लोक आले होते. हा त्यांचा अवमान आहे. खासदार इम्तियाज जलील श्रीराम मंदिरात गेले हाेते, त्या ठिकाणी गोमूत्र का शिंपडले नाहीॽ अदानींच्या भ्रष्टाचाराने भाजपचे हात बरबटले आहेत. ते सावरकरांचे पूजन करतात. ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, तेच लोक अशा यात्रा काढतात. हा भाजपचा ढोंगीपणा आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.