आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • The Ministers Changed The Boundaries Of The Groups According To Convenience; Everyone Was Shocked By Danve Bagde's Entry In The Hearing On Group Objections |marathi News

कार्यकर्त्यांचे आरोप:मंत्र्यांनी गटांच्या हद्दी सोयी नुसार बदलून घेतल्या; गट-गण आक्षेपांवरील सुनावणीत दानवे-बागडेंच्या एन्ट्रीने सारे चकित

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेचे ७० गट व पंचायत समितीच्या १४० गणांच्या प्रारूप आराखड्यावर दाखल झालेल्या आक्षेपांवर गुरुवारी (१६ जून) विभागीय आयुक्तालयातील अपर आयुक्त बाबासाहेब बेलदार यांच्याकडे सुनावणी झाली. सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, फुलंब्री तालुक्यातील काही राजकीय- सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आमदार, खासदार, मंत्र्यांनी प्रभावाचा वापर करून अनेक सर्कलच्या सीमा त्यांच्या सोयीसाठी तोडल्या, औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील सीमा भेदल्या, असा आरोप केला. मंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रशांत बंब यांच्याकडे अनेकांचा रोख होता.

विशेष म्हणजे ही सुनावणी सुरू असताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार हरिभाऊ बागडे हे भाजप नेते अचानक आयुक्तालयात आल्याने राजकीय तर्कवितर्क सुरू झाले. “मतदारसंघातील कामानिमित्त आपण आलो आहोत, गट-गणांच्या सुनावणीत मी हस्तक्षेप करणार नाही. कार्यकर्तो त्यांचे काम करत आहेत,’ असे म्हणत दानवेंनी या विषयावर फारसे बोलणे टाळले. मात्र आयुक्तांच्या केबिनमध्ये ३० ते ४० मिनिटे बंदद्वार चर्चा करून ते निघून गेले.

८ जूनपर्यंत एकूण १५८ आक्षेप प्राप्त झाले आहेत. यात गटांसाठी १३१, तर गणांसाठी २७ आक्षेपांचा समावेश आहे. सर्वाधिक गटांसाठी ६६ व गणांसाठी १८ आक्षेप औरंगाबाद तालुक्यातील आहेत. त्यांच्या आक्षेपांवर सुनावणी पूर्ण करून २७ जूनपर्यंत हा आराखडा अंतिम केला जाणार आहे. मराठवाड्यातील आठही जिल्हा परिषदांसाठी आयुक्तालयातच सुनावणी सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी राजकीय कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी होती. शुक्रवारी अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. अपर आयुक्त बाबासाहेब बेलदार, उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी यांच्याकडे चार-चार जिल्ह्यांतील सुनावण्या सुरू आहेत.

पिसादेवी, वरझडीच्या हद्दीचा प्रश्न महत्त्वाचा
पिसादेवी गावाला दळणवळणाच्या सोयीसाठी वरूडशी जोडणे गरजेचे आहे, अशी बाजू बाबासाहेब चौधरी यांनी मांडली, तर आरोग्य, शैक्षणिक सेवांच्या दृष्टीने वरझडीला करमाड जोडणे हे व्यवहार्य असल्याचे मत संतोष पठाडे यांनी मांडले. दिवसभर या परिसरातील राजकारणी आयुक्तालयात तळ ठोकून होते. संजय भालेराव म्हणाले, शासनाच्या निर्देशानुसार गण आणि गटांची रचना करताना गावकऱ्यांची सोय पाहणेही गरजेचे आहे. आम्ही आमचे मुद्दे प्रभावीपणे लक्षात आणून दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...