आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिवंतपणी अनेकांना नेहमीच मदत केली. मृत्यूनंतरही माझ्या देहाचा उपयाेग वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केलेल्या विजयालक्ष्मीबाई सदाशिवराव चंद्रमोरे (९०) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचे देहदान करून इतर सदस्यांनीही देहदानाचा संकल्प केला. विजयालक्ष्मीबाई या निवृत्त पोलिस उपअधीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांच्या आई होत. शुक्रवारी पहाटे त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आईच्या इच्छेनुसार तिचे नेत्रदान व देहदान करायचे आहे, म्हणून चंद्रमोरे यांनी औरंगाबाद यूथ सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे राजेशसिंह सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला. सूर्यवंशी यांनी तत्काळ पुढील प्रक्रिया केली. कमलनयन बजाज हॉस्पिटलच्या पथकाने घरी येऊन आजींचे नेत्रदान करून घेतले. त्यानंतर घाटीतील अॅनाटॉमी विभागाकडे मृतदेह सुपूर्द करण्यात आला. त्याच वेळी प्रेमसागर व त्यांच्या पत्नी सुचिता यांनीदेखील देहदान करण्याचा संकल्प करून फॉर्म भरून दिला. विभागाचे प्रमुख डॉ. लईक यांनी या कुटुंबीयांना प्रमाणपत्र देऊन आभार मानले. विजयालक्ष्मीबाई यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी प्रभावती, सून, नातू असा परिवार आहे. या देहदानासाठी औरंगाबाद यूथ सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे प्रा. रवींद्र जिगे पाटील, मंगेश मोरे, चंपालाल हारे यांनी परिश्रम घेतले. जागतिक नेत्रदानदिनी विजयालक्ष्मीबाई यांचे मराठवाड्यातील पहिले नेत्रदान असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे देहदानाचे प्रमाण कमी झाले आहे. माझ्या आईचा मृतदेह वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल. इतर कर्म म्हणून आम्ही अनाथांना अन्नदान करणार आहोत, असे प्रेमसागर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.