आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपाचे आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ एक महिना बाकी आहे. पुढील कामाचे आर्थिक नियोजन करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मनपाचा अर्थसंकल्प सादर होईल, असे संकेत आहेत. मात्र आतापर्यंत हा नियम पाळला गेला नाही. त्यामुळे यंदाचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प मार्चमध्ये सादर होईल, अशी अपेक्षा आहे, अशी माहिती मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
मनपाचे वार्षिक उत्पन्न ७०० ते ८०० कोटींच्या घरात आहे. पण, गेल्या काही वर्षांत मनपाचे बजेट सुमारे दीड ते १७०० कोटींपर्यंतचे राहिलेले आहे. प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात स्थायी समिती व नंतर सर्वसाधारण सभेत वाढ केली जाते. त्यामुळे उत्पन्न व खर्चाच्या आकड्यांत कोट्यवधींची तफावत असते. दोन वर्षांपासून महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरू आहे.
त्यामुळे प्रशासनाकडून तरी वास्तववादी अंदाजपत्रक सादर केले जाईल, अशी अपेक्षा होती, पण २०२२-२३ या वर्षासाठी गतवर्षी तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी १७२८ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. यातील बहुतांश कामे झाली नाहीत. गतवर्षी ३१ मार्चला बजेट सादर केले होते. यंदा तरी फेब्रुवारीत बजेट सादर होणार का, असा प्रश्न डॉ. चौधरी यांना केला असता ते म्हणाले, सध्या अधिकारी-कर्मचारी जी-२० परिषदेच्या कामात व्यग्र आहेत. असे असले तरी विभागनिहाय कामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. जी-२० परिषदेनिमित्त येणारे शिष्टमंडळ गेल्यानंतर म्हणजेच मार्चमध्ये बजेट सादर केले जाईल.
वसुलीचा होईल परिणाम मालमत्ता कर आणि पाणीपट्टी करातून यंदा ४८० कोटी वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, आतापर्यंत वसुलीचा आकडा शंभर कोटींच्या आसपासही गेला नाही. त्याचा बजेटवर परिणाम होऊ शकतो. विशेष म्हणजे आतापर्यंत पाणीपट्टी ४ हजार होती. मात्र, तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीपट्टी दोन हजारांवर आणली. त्यामुळेदेखील या वर्षीच्या वसुलीचा आकडा काही प्रमाणात कमी दिसत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.