आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाकाळात अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले. मात्र लॉकडाऊननंतर जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा ३ ते १८ वयोगटातील अनेक बालके पुन्हा शाळेत आलीच नाहीत. अशा शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनामार्फत दोन टप्प्यांत ‘मिशन झीरो ड्रॉपआऊट’ मोहीम राबवण्यात आली. जानेवारी-फेब्रुवारीत झालेल्या सर्वेक्षणात औरंगाबाद जिल्ह्यात ४३२ शाळाबाह्य मुले असल्याचे समोर आले होते. मात्र पाच महिन्यांनंतर पुन्हा जुलै महिन्यात सर्वेक्षण केले असता ही संख्या १,२४४ पर्यंत म्हणजेच तिप्पट वाढल्याचे समोर आले आहे. मात्र शाळाबाह्य मुलांचे अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांच्या मते, सरकारी सर्वेक्षणातील ही आकडेवारी फारच त्रोटक असून यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मुले अजूनही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत.
राज्यात मार्च २०२१ मध्ये शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती. परंतु, नंतर कोरोनामुळे राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने ही शोधमोहीम प्रभावीपणे राबवता आली नाही. त्यामुळे जानेवारी २७ ते ५ फेब्रुवारीदरम्यान शिक्षण विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यात ४३२ मुले शाळाबाह्य आढळून आली होती.
पुन्हा एकही मूल शाळाबाह्य होता कामा नये म्हणून जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा करण्यात आला. यात सर्व शासकीय विभागांच्या कर्मचाऱ्यांनी ५ ते २० जुलैदरम्यान जिल्ह्यात एकत्रितपणे मिशन झीरो ड्रॉपआऊट मोहीम राबवली. यासाठी तालुकास्तर, केंद्रस्तर व गावस्तरावर बैठका घेण्यात आल्या. गावागावातून प्रभातफेऱ्या काढून, ढोलच्या गजरात दवंडी देत, सार्वजनिक ठिकाणी जनजागृती, प्रबोधन केले. सरपंच, पोलिस पाटील, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, अंगणवाडी मदतनीस, ग्रामसेवक, तलाठी, पदवीधर-पदव्युत्तर डीएड, बीएड, एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले होते. घरोघरी जाऊन सहा ते अठरा वयोगटातील शाळेत न जाणारे कुणी मुलं आहेत का? याची माहिती घेतली होती.
पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न
सर्वेक्षणात शाळाबाह्य आढळून आलेल्या सर्व मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार आहे. वयोगटानुसार त्यांना संबंधित वर्गात प्रवेश देऊन त्यांच्या अभ्यासाची संपूर्ण तयारी करून घेण्यात येईल. शाळाबाह्य मुलांची माहिती घेण्याची मोहीम एवढ्यावरच न थांबता वर्षभर चालणार आहे. ज्या ज्या वेळी अशी मुले दिसून येतील तेव्हा त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल.
-जयश्री चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.